राज्यात 8 हजार पोलिसांची भरती करणार - अनिल देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:19 AM2020-01-27T00:19:19+5:302020-01-27T00:19:38+5:30

'राज्याच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे.'

Anil Deshmukh to recruit 8,000 policemen in the state | राज्यात 8 हजार पोलिसांची भरती करणार - अनिल देशमुख

राज्यात 8 हजार पोलिसांची भरती करणार - अनिल देशमुख

Next

गोंदिया : जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढील काळात चांगले काम करावे. लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदान येथे साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री देशमुख बोलत होते.

यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आमदार विनोद अग्रवाल, माजी खासदार खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एम.रामानुजम, उपवनसंरक्षक एस.युवराज व वन विकास महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती दिव्य भारती यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले, राज्याच्या टोकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजुर, महिला, आदिवासी व दलित बांधवांसह सर्वांच्या विकासासाठी भविष्यात अनेक योजना राबविण्यात येतील. मधल्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत होता. अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकऱ्यांवर असलेले कर्ज माफ झाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच महत्वाचा निर्णय घेवून शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

पुढील काळात जे शेतकरी कर्जाची नियमीत परतफेड करतात त्या शेतकऱ्यांसाठी सुध्दा शासन योजना जाहीर करणार आहे. 2 लाखाच्यावर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा कसा देता येईल यादृष्टीने राज्य शासन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असे सांगून श्री देशमुख म्हणाले, रजेगाव/काटी, तेढवा, पिंडकेपार यासह अनेक उपसा सिंचन व सिंचन प्रकल्पाची कामे जवळपास पूर्ण झाली आहे. धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 पूर्ण करण्यासाठी पहिला हप्ता म्हणून 50 कोटी रुपये मंजूर झाले आहे. हा उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. या प्रकल्पाचा फायदा गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार आहे. आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात 20 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धान खरेदीचे 240 कोटी रुपये अदा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्री देशमुख पुढे म्हणाले, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे केंद्र शासनाच्या व्यवस्थापन परिणामकारकता मुल्यमापनात या प्रकल्पाने राज्यात पहिला तर देशात बारावा क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल या प्रकल्पाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन श्री देशमुख यांनी केले. ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पोलीस विभागाकडून नक्षल कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी चांगले काम सुरु आहे. राज्यातील युवकांना पोलीस सेवेत येण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी 8 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लवकरच राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे यासाठी पोलीस विभाग प्रभावी पध्दतीने काम करीत असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांनी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी कायदा केला होता. त्यांच्यानंतर या कायदयाची अंमलबजावणी व्यवस्थीत झाली नाही. ग्रामीण भागात अवैध सावकारीचा त्रास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होतो आणि त्यांची लुबाडणूक केली जाते. अशा या अवैध सावकारीवर कडक निर्बंध आणण्यासाठी पुढील काळात पोलीस विभागाच्या वतीने कठोर पाऊले उचलली जातील याची ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हा मागास, दुर्गम, नक्षलग्रस्त असला तरी जिल्ह्यातील 180 तरुण युवकांनी मागीलवर्षी व यावर्षीच्या मुंबई मॅरॉथॉन स्पर्धेत सहभाग घेवून चांगले यश मिळविले असल्याचे सांगून श्री देशमुख म्हणाले, या युवकांना पुढील काळात प्रोत्साहन देण्यासाठी गोंदिया येथे एका मोठ्या मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. मुंबई येथे पुढील मॅरॉथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, त्यांना तेथे मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. परेडचे निरीक्षण केले. शालेय मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम बघून त्यांनी प्रशंसा केली. विविध अधिकारी-कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा व संस्थांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला.

यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष संजय दैने, सचिव देवसूदन धारगावे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एसईए हाश्मी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी श्री तारसेकर, युवराज कुंभलकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापिका मंजुश्री देशपांडे यांनी केले.

Web Title: Anil Deshmukh to recruit 8,000 policemen in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.