लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहे. पण, फेरतपासणीत अनेक लाभार्थ्यांची नावे वगळल्यास अंगणवाडी सेविकांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच अंगणवाडी सेविकांवर विविध कामांचा भार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याला राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे. याचा विरोध करण्यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे.
राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेक बोगस लाभार्थीसुद्धा लाभ घेत असल्याची बाब उघडकीस आली. यानंतर शासनाने या योजनेच्या लाभासाठी काही निकष तयार केले आहे. या निकषात बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी आता या निकषानंतर पात्र व अपात्र लाडक्या बहिणींच्या याद्यांची व कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.
हे फेरतपासणीचे काम करण्याचे आदेश तोंडी स्वरूपात राज्यातील सर्वच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना बालविकास अधिकाऱ्यांनी दिले आहे. यात लाभार्थ्यांचे रेशनकार्ड, कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांचा पत्ता, मोबाइल क्रमांक त्यांची माहिती संकलित करण्यास अंगणवाडी सेविकांना सांगितले आहे.
केंद्र सरकारने अंगणवाडी सेविकांना एकात्मिक बालविकास विभागाशिवाय इतर कुठलीही कामे देऊ नये अशा वेळोवेळी सूचना केल्या आहेत. याच आदेशाचा दाखला देत अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे फेरतपासणी करण्याचे काम करण्यास नकार दिला आहे. तसेच जिल्ह्यात अंगणवाडी सेविका मोर्चे काढून याचा विरोध करीत आहेत.
अंगणवाडी सेविकांवर या कामांचा भार
- अंगणवाडी सेविकांच्या कामाचे तास ठरवून दिले आहे. त्यानुसार त्यांना साडेपाच तास काम करायचे असून त्यात आहार पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, गर्भवती, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनाचे काम करीत आहे.
- मात्र, त्यांच्यावर शासनाकडून वेळोवेळी विविध कामे लादली जात असल्याने मूळ कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आयटकचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांनी सांगितले.