बीडी कामगारांना रोजगार व बिडी विक्रीची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:28+5:30
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ पुकारले आहे. ‘लॉकडाऊन’ चा तिसरा टप्पा सुरू असून देशभर रेड, ऑरेंज व ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहे. ऑरेज व ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बिडी कारखाने सुरू झाले नसल्याने संघटनेने बिडी मालकांकडे कारखाने सुरू करून बिडी कामगारांना काम देण्यास सांगितले होते.

बीडी कामगारांना रोजगार व बिडी विक्रीची परवानगी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘लॉकडाऊन’मध्ये बिडी कामगारांचा रोजगार बुडाला असून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत केंद्र व राज्य सरकारने तातडीने बिडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा व बिडी विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बिडी कामगार फेडरेशनच्यावतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील व गोंदिया-भंडारा बिडी कामगार आपल्या कुटुंबियांसह सोमवारी (दि.१८) घरीच लाक्षणिक उपोषण करणार आहेत. यानंतरही हा प्रश्न न सुटल्यास बिडी कामगार रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती फेडरेशनचे राज्याध्यक्ष कारभारी उगले व सचिव शंकर न्यालपेलली यांनी दिली.
कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ पुकारले आहे. ‘लॉकडाऊन’ चा तिसरा टप्पा सुरू असून देशभर रेड, ऑरेंज व ग्रीन झोन जाहीर करण्यात आले आहे. ऑरेज व ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बिडी कारखाने सुरू झाले नसल्याने संघटनेने बिडी मालकांकडे कारखाने सुरू करून बिडी कामगारांना काम देण्यास सांगितले होते. मात्र बिडी मालकांनी ‘लॉकडाऊन’ काळात केंद्र व राज्य सरकारने तंबाखू आणि तंबाखूजन्य बिडी विक्री करण्यास मनाई केली आहे. सरकारने सदरील मनाई मागे घेतल्याशिवाय कारखाने सुरू करून बिडी कामगारांना काम देऊ शकत नसल्याची भूमिका जाहीर केली. यामुळे बिडी कामगारांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. बिडी कामगार मागील ४५ दिवसांपासून कामाअभावी बेकार आहेत.
त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून बिडी कामगारांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. तसेच बिडी मालकाकडूनही मदत मिळालेली नाही. बिडी कामगार सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांत असून ९९ टक्के बिडी कामगार महिला आहेत. अशा परिस्थितीत कामगारांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. केंद्र व राज्य सरकारने बिडी कामगारांच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यांना त्वरीत आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे. तसेच बिडी मालकांनी बिडी कारखाने त्वरीत सुरू करून बिडी कामगारांना काम देण्यात द्यावे, केंद्र सरकारने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास त्वरीत परवानगी द्यावी, मालकांनी बिडी कामगारांना मार्च, एप्रिल व मे या ३ महिन्यांकरिता ६ हजार रूपये अनामत रक्कम द्यावी, तेलंगाणा सरकारच्या धर्तीवर बिडी कामगारांना जीवन भत्ता म्हणून दरमहा २ हजार रूपये राज्य सरकारने द्यावे, केंद्र सरकारने केंद्रीय कामगार कल्याण निधीमधून प्रत्येक बिडी कामगारास सात हजार पाचशे रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांसह, मुख्यमंत्री, पालकमंत्री, कामगार मंत्री व कामगार आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. आपल्या मागणीसाठी बिडी कामगारांनी १८ मे रोजी घरीच राहून लाक्षणिक उपोषण करावे असे रामचंद्र पाटील, अनिल तुमसरे, विकास कुर्वे, रामकिशोर कावळे, मनोज वलथरे, देवेंद्र गणविर यांनी कळविले आहे.