प्रभाग बैठकीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा
By Admin | Updated: November 12, 2014 22:46 IST2014-11-12T22:46:38+5:302014-11-12T22:46:38+5:30
जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग समितीची आढावा बैठक महत्वपूर्ण आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून सर्वांगिण विकास साधून विकास कार्यांना

प्रभाग बैठकीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधावा
बोंडगावदेवी : जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग समितीची आढावा बैठक महत्वपूर्ण आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून सर्वांगिण विकास साधून विकास कार्यांना गती देणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन बोंडगावदेवी प्रभागाचे जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी केले.
खांबी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत आयोजित १५ व्या बोंडगावदेवी जि.प. प्रभाग समितीच्या आढवा बैठकीदरम्यान ते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य अरविंद शिवणकर होते. याप्रसंगी दर्शनीस्थळी खांबी ग्रामपंचायतचे सरपंच शारदा खोटेले, सिलेझरीचे सरपंच धार्मिक गणवीर, बाक्टीचे सरपंच जितेंद्र शेंडे, बोंडगावदेवीचे सरपंच वर्षा फुल्लूके प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्ज्वलित करुन अभिवादन करण्यात आले. आढवा बैठकीला प्रभागातील बोंडगावदेवी, चान्ना/बाक्टी, विहीरगाव, सिलेझरी, पिंपळगाव, खांबी, निमगाव, अरततोंडी, दाभना, इंझोरी या ठिकाणचे सरपंच, ग्रामस्थ, ग्रामसेवक तसेच तालुका पातळीवरील जिल्हा परिषद सदस्य, राज्यशासनाचे खाते प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. गोंदिया जिल्हा परिषदेचे सदस्य अरविंद शिवणकर यांनी यापूर्वी बोंडगावदेवी जि.प.क्षेत्रात १४ आढावा बैठकी घेवून गावपातळीवरील सर्वांगिण विकास साधण्याचा कसोशीने प्रयत्न केला. प्रभाग समितीच्या बैठकीत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वलथरे यांनी पंचायत विभागाचा आढावा सादर केला.
महसूल विभागाचे तलाठी यु.टी. वागधरे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता टी.पी. कचरे, शिक्षण विभागाचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अहिल्या खोब्रागडे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता एच.बी. चव्हाण, पंचायत समिती सांख्यिकी अधिकारी अनुपकुमार भावे, कृषी विभागाचे सी.बी. सिरसाम, येरणे यांनी आढावा सादर केला.
बैठकीला मार्गदर्शन करताना शिवणकर म्हणाले की, प्रभागातील विकास कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. जिल्हा विकास निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध योजना मार्गी लागल्या आहेत. आपल्या प्रभागात निधीची कमतरता पडणार नाही, याची दक्षता घेवून जिल्हा पातळीवरुन मोठ्या प्रमाणात निधी आणून सर्वांगिण विकास साधण्यावर आपला प्राथमिक भर असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीच्या माध्यमातून विविध समस्यांची जाणीव होते. बैठकीच्या मंथनातून कामाचे नियोजन करुन विकासाचा टप्पा गाठणे सहज शक्य आहे. सार्वजनिक हिताला प्राधान्य देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन शिवणकर यांनी केले. तळागाळातील सामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने होण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असा सुतोवाच त्यांनी केले. महसूल विभागाच्या वतीने बनविले जात असलेले रेशन कार्डांचे त्वरित वाटप करावे, अशा सूचना बैठकीदरम्यान केल्या. प्रभागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी करोडोचा निधी उपलब्ध असून येत्या काही दिवसांत रस्त्याच्या कामांना गती येणार आहे. गावाच्या विकासात आडकाठी आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ग्रामपंचायतने कर वसुली नियमित करुन विकासात आघाडी घेण्याचे आवाहन जि.प. सदस्य अरविंद शिवणकर यांनी केले.
प्रभाग समितीच्या बैठकीचे संचालन प्रभाग समितीचे सचिव तथा पंचायत समितीचे कृषी अधिकारी सी.बी. सिरसाम यांनी केले.
बैठकीची व्यवस्था खांबी ग्रामपंचायतचे सचिव तुरकर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक विजय शहारे व माणिक खोटेले यांनी यशस्वीपणे पार पाडली. (वार्ताहर)