गोंदिया : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणातून सुध्दा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मंगळवारी (दि.८) दुपारी तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे संपुर्ण २३ दरवाजे उघडण्यात आले.
यातून दरवाज्यांमधून १ लाख ८३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे बॅरेजमधून पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.