८३७७ रुग्णांना मिळाले नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 00:44 IST2016-09-01T00:44:37+5:302016-09-01T00:44:37+5:30
कोणताही आजार हा श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करीत नाही. श्रीमंत व्यक्तीला जर हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदू व मज्जासंस्थेचे आजार झाले...

८३७७ रुग्णांना मिळाले नवजीवन
जीवनदायी योजना : बीपीएल रुग्णांवर महागडा उपचार
गोंदिया : कोणताही आजार हा श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करीत नाही. श्रीमंत व्यक्तीला जर हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदू व मज्जासंस्थेचे आजार झाले तर तो त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार व शस्त्रक्रिया करु शकतो. परंतु गरीब आणि दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्यांना महागडा उपचार करणे शक्य होत नाही. अशा रुग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून नवजीवन मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८३७७ रुग्णांनी या योजनेअंतर्गत उपचाराचा लाभ घेतला.
राज्य शासनाने दारिद्रय रेषेखाली जीवन जगणा-या व्यक्तिला हृदयरोग, मेंदू, मज्जासंस्थांचे विकार आणि मुत्रपिंडाच्या प्रत्यारोपणाचे उपचार व शस्त्रक्रियेसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हयातील तब्बल ८३७७ रुग्णांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे. या योजनेअंतर्गत निवड केलेल्या रुग्णांवर जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील खाजगी तथा शासकिय रु ग्णालयातून उपचार मिळाले आहेत. या रु ग्णांच्या आजारावरील महागडे उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च राज्य शासनाने केल्यामुळे त्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखालील पिवळया शिधापत्रिकाधारक कुटुंबाबरोबरच अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक आणि दारिद्रय रेषेवरील केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लक्ष रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशी आरोग्य ओळखपत्रे असणारे कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
२१ नोव्हेंबर २०१३ ते २८ आॅगस्ट २०१६ या कालावधीत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हयात व जिल्हयाबाहेरील रुग्णालयात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावर १६ कोटी १३ लक्ष २१ हजार ७१५ रुपये खर्च करण्यात आले. या योजनेअंतर्गत जळालेले रुग्ण, कार्डिओलॉजी, क्रिटीकल केअर, ईएनटी सर्जरी, इन्डोक्रोनोलॉजी, जनरल मेडिसीन अशा प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
जिल्हयात या योजनेअंतर्गत उपचार व शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आलेल्या खाजगी व शासकिय रुग्णालयातून २६२८ रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यासाठी ३ कोटी ८० लाख १५ हजार ४०० रुपये, तर जिल्हयाबाहेरील खाजगी, विश्वस्त संस्थांचे रुग्णालय व शासकिय रुग्णालयातून जिल्हयातील ५७४९ रुग्णांनी उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत. यासाठी शासनाने १२ कोटी ३३ लाख ६ हजार ३१५ रु पये रु ग्णांवर खर्च केले.
जिल्हयातील गोरगरीब दारिद्रय रेषेखाली जीवन जगणा-या रु ग्णांसाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ख-या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. आता ही योजना ४ आॅगस्ट २०१६ पासून महात्मा फुले जनआरोग्य योजना म्हणून राज्यात लागू झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)