गोंदियातील आयसोलेशन कक्षात ६१ जण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:10+5:30
तामिळनाडू येथील एक ट्रक चालक गोंदिया सामान सोडण्यासाठी आला होता. तो येथून परत गेल्यानंतर तामिळनाडू येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोंदिया येथे त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना रविवारी (दि.१०) आयसोलेशन कक्षात दाखल केले. त्यामुळे सध्या एकूण ६१ जणावर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे.

गोंदियातील आयसोलेशन कक्षात ६१ जण दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील गर्रा येथील एक युवक छत्तीसगड राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गर्रा येथील युवकाचे कुटुंबीय आणि त्याच्या संपर्कात आलेल्या ३४ जणांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने घेवून तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. यासर्व ३४ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर तामिळनाडू येथील एक ट्रक चालक गोंदिया सामान सोडण्यासाठी आला होता. तो येथून परत गेल्यानंतर तामिळनाडू येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोंदिया येथे त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना रविवारी (दि.१०) आयसोलेशन कक्षात दाखल केले. त्यामुळे सध्या एकूण ६१ जणावर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे.
तामिळनाडू येथील एक ट्रक चालक काही सामान सोडण्यासाठी पाच सहा दिवसांपूर्वी गोंदिया येथे आला होता. यानंतर सामान सोडून तामिळनाडूला परतला.तिथे परतल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी केला असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे तेथील पोलीस अधीक्षकांनी गोंदिया पोलिसांना कळविले. त्यामुळे त्या चालकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १० जणांना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात रविवारी (दि.१०) दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.
या सर्व १० जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर येथील आयसोलेशन कक्षात ५१ जणांना यापूर्वीच दाखल करण्यात आले. त्यामुळे सध्या एकूण ६१ जणांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे. तर जिल्ह्यातील सात शासकीय क्वारंटाईन कक्षात एकूण ४८ जणांवर उपचार सुरू आहे. यात एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज कुडवा गोंदिया १७, चांदोरी ७, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट, नगर परिषद तिरोडा ४, समाज कल्याण निवासी शाळा, डव्वा २, शासकीय आश्रमशाळा इळदा १३ आणि बिरसी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ७ अशा एकूण ४८ व्यक्ती उपचार घेत आहेत.
विशेष म्हणजे मागील ३० दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही.
१९ जणांच्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३२८ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३०९ जणांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.