५२५ पाण्याचे स्रोत दूषित
By Admin | Updated: May 11, 2015 00:30 IST2015-05-11T00:30:41+5:302015-05-11T00:30:41+5:30
जिल्ह्यात गॅस्ट्रो, डिसेंट्री व डायरियाने थैमान घातल्याच्या वार्ता कानी पडताच आरोग्य विभाग खळबडून जागा झाला. ...

५२५ पाण्याचे स्रोत दूषित
नरेश रहिले गोंदिया
जिल्ह्यात गॅस्ट्रो, डिसेंट्री व डायरियाने थैमान घातल्याच्या वार्ता कानी पडताच आरोग्य विभाग खळबडून जागा झाला. गोंदिया जिल्ह्यातील ५२५ ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सोबतच गॅस्ट्रो, डिसेंट्री व डायरियाने ग्रस्त असलेल्या ५९० रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.
जिल्हा प्रयोगशाळेतर्फे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात ९९६० पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यात ५२५ पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळले आहे. एकट्या एप्रिल महिन्यात ९५ पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. परिणामी गोंदिया जिल्ह्यात ग्रेस्ट्रोचे ११४ रुग्ण, डिसेंट्रीचे २४० रुग्ण, डायरीयाचे २३६ रुग्ण गोंदिया जिल्ह्यात आढळले आहेत. तसेच टायफाईडचे १२४ रुग्ण या चार महिन्यात आढळल्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
तिरोडा तालुक्यातील सुकडी (डाकराम) व ठाणेगावात डायरियाने थैमान घातल्याच्या बातम्या येताच आरोग्य समितीने सभा घेतली. या सभेत गोंदिया जिल्ह्यातील ५२५ पाण्याचे स्त्रोत दूषित असल्याची माहिती पुढे आली असून गेस्ट्रो, डिसेंट्री व डायरियाचे थैमान जिल्ह्यात सुरू आहेत. साथ रोग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. एकट्या एप्रिल महिन्यात ४३० पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले आहेत. पाण्यामुळे विविध आजार जडतात यासाठी नागरिकांना जनजागृती करणारे उपक्रम आरोग्य विभागाने ठोसपणे राबविले नाही. जिल्ह्यातील १५७०२ जणांच्या रक्ताचे नमुने हिवताप कार्यालयाने घेतले. त्यात एप्रिल महिन्यात ३२ जणांना मलेरिया असल्याचे लक्षात आले. चार महिन्यात मलेरियाचे २३३ रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
अशा दिल्या लस
प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत मार्चमध्ये २१ हजार ७३ प्रसूतीपूर्व नोंदणी करण्यात आली. यापैकी १७ हजार १७२ गरोदर मातांना धनुर्वात लस देण्यात आली. डीपीटी व पोलीओची मात्रा १९ हजार ६३९ जणांना देण्यात आली. १९ हजार ७७८ जणांना गोवरची लस देण्यात आली. जीवनसत्व अ १९ हजार ३२२ बालकांना देण्यात आले. १७ हजार ७१ मातांना लोहयुक्त गोळ्या देण्यात आल्या. विविध प्रकारच्या लस देण्यात आल्या आहेत.
८४२६ बालके कुपोषित
कुपोषण मुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न शासन पाहत असले तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र कुपोषण कमी होताना दिसत नाही. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने ७९ हजार २४१ बालकांची तपासणी केल्यावर ७ हजार २४४ बालके कमी वजनाचे तर १ हजार १८२ बालके तीव्र कुपोषित असल्याचे लक्षात आले आहे.
कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
कुटुंब कल्याणचे ५० टक्केपेक्षा कमी उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य समितीत घेण्यात आला आहे. ज्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरुन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्याचे निर्देश दिले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव व सुकडी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी कुटुंबकल्याणचे उद्दिष्ट पूर्ण न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
नागरिकांनी पाणी पितांना काळजी घ्यावी. उन्हाळ्यात बर्फाचे पाणी पिऊ नये. दूषित पाण्यामुळे बर्फ तयार केला जाऊ शकतो.ठाणेगावात डायरीयाचे रूग्ण आढळले. ज्यांनी बर्फाचे पाणी पिल्ले त्यांनाच डायरीया झाला. दूषित पाण्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यासाठी स्वच्छ पाणी पिऊन आरोग्य सुदृढ ठेवावे. गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळेल यासाठी ग्राम पंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
डॉ. हरीश कळमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गोंदिया.