विदेशातून परतलेले ५१ जण निगराणीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:06+5:30

बाहेरील देशातून कामानिमीत्त देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाय योजना केल्या जात आहे. तर जिल्हास्तरावर सुध्दा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे.

51 foreign return under observation | विदेशातून परतलेले ५१ जण निगराणीखाली

विदेशातून परतलेले ५१ जण निगराणीखाली

ठळक मुद्देजिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही: आरोग्य विभागाकडून दररोज आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तर कोरोनामुळे विदेशात वास्तव्यास असणारे अनेकजण स्वगृही परतत आहेत. गुरूवारपर्यंत (दि.१९) विदेशातून एकूण ५१ जण परतले असून यासर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच या सर्वांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे सर्वजण प्रशासनाच्या निगरानीखाली आहेत.
बाहेरील देशातून कामानिमीत्त देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणा करीत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने शासनातर्फे यावर विविध उपाय योजना केल्या जात आहे. तर जिल्हास्तरावर सुध्दा कोरोनाचा दररोज आढावा घेतला जात आहे.
विदेशातून जिल्ह्यात परतणाºया नागरिकांची नोंदणी केली जात आहे. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. विदेशात असलेले ५१ जण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात परतले आहेत. त्यात गोंदियात १४, तिरोडा तालुक्यात १२, देवरी १, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यात प्रत्येक एक व्यक्ती विदेशातून परतले आहेत. या ५१ लोकांची तपासणी करण्यात आली. यात त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही. बुधवारी (दि.१८) तिरोडा तालुक्यातील ९ मजूर सौदी व उमान या देशातून परतले आहे. त्यांचीही तपासणी आरोग्य यंत्रणेने केली आहे. मात्र काही जणांनी हे ९ मजूर कोरोनाचे संशयीत असल्याची अफवा पसरविली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाने यासर्व ९ मजुरांची आरोग्य तपासणी केली असून त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

धोबीसराड येथील ‘त्या’ रुग्णाचा रिर्पोट निगेटिव्ह
देवरी तालुक्यातील धोबीसराड येथील रहिवासी दुबई येथे वास्तव्यास होता. तो काही दिवसांपूर्वी स्वगृही परतला. मात्र त्यापूर्वीच त्याने नागपूर येथील रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली होती. त्याचा रिर्पोट सुध्दा निगेटिव्ह आला आहे. तो सध्या धोबीसराड येथे वास्तव्यास असून त्याला १४ दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहे.
२३४ जण प्रशासनाच्या देखरेखखाली
जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ५१ जण विदेशातून परतले असून या ५१ नागरिकांच्या संर्पकात आत्तापर्यंत १८३ जण संर्पकात आले आहे. ते वास्तव्य करित असलेल्या ठिकाणाचे विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून हे सर्व २३४ जण प्रशासनाच्या देखरेखेखाली आहेत.
चांदोरी खुर्द उपकेंद्रात विशेष कक्ष
तिरोडा येथील काही मजूर दुबई, ओमान येथे मजुरीसाठी गेले होते. ते दोन दिवसांपूर्वीच स्वगृही परतले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोरोनाची कुठलीच लक्षणे आढळून आली नाही. मात्र यानंतरही आरोग्य विभागाकडून विशेष उपाय योजना केल्या जात आहे. तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील प्राथमिक उपकेंद्रात १० खाटांचे विलगीकरण कक्ष गुरूवारी तालुका वैद्यकीय अधिकारी शितल मोहने यांच्या निर्देशावरुन तयार करुन ठेवण्यात आले आहे.

Web Title: 51 foreign return under observation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.