२६२ पोलीस कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:52 IST2018-06-27T00:50:19+5:302018-06-27T00:52:16+5:30
दिवसाचे २४ तास शिस्त, गस्त व बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहावे लागत होते.

२६२ पोलीस कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवसाचे २४ तास शिस्त, गस्त व बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहावे लागत होते. आ.गोपालदास अग्रवाल व पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हक्काची वसाहत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून १४९ कोटी रूपये राज्य सरकारने मंजूर केले आहे.
जिल्ह्यात १६ पोलीस ठाणे आहेत. २४ तास लोकांचे संरक्षण करणाºया पोलिसांची स्वतंत्र वसाहत बहुतांश ठिकाणी नाही. ज्या ठिकाणी वसाहत आहे. त्या ठिकाणच्या जीर्ण इमारतीतून पाणी गळत होते. नाल्या घाणीने तुंबलेल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना त्या क्वार्टरमध्ये राहणे अवघड झाले होते. जोराचा वारा आल्यास छत कधी कोसळून पडेल याचा नेम नव्हता. पोलीस कर्मचाºयांना हक्काची वसाहत असावी, यासाठी मागील अनेक वर्षांपासून आ. अग्रवाल व पोलीस विभागाचा पाठपुरावा सुरू होता. विद्यमान पोलीस अधीक्षक पाटील भुजबळ यांनी पोलीस ठाणे व पोलिसांच्या वसाहतीचा तिढा सोडविण्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासन दरबारी लावून धरले. त्यामुळे जिल्ह्यातील ४ पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांच्या वसाहतीसाठी व जिथे पोलीस ठाण्याची इमारत नाही. त्यासाठी एकूण १४९ कोटी रूपये मंजूर केले आहे.
गोंदिया शहर ठाण्यातील कर्मचाºयांसाठी वसाहत मनोहर चौकात असलेल्या जुन्या पोलीस वसाहतीमध्ये चार-ते पाच मजली इमारत बांधण्यासाठी ५१ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या वसाहतीचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुध्दा करण्यात आली आहे.
गोंदिया शहर व रामनगर या दोन पोलीस ठाण्यातील १४० कर्मचाºयांसाठी ही इमारत राहणार आहे. रामनगर पोलीस ठाण्याची चार मजली इमारत व रावणवाडी पोलीस पोलीस ठाण्याची इमारत व रावणवाडीच्या ३८ कर्मचाºयांसाठी ५४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. सालेकसा पोलीस ठाण्याची प्रशासकीय इमारत व १२ अधिकारी व ७२ कर्मचारी असे ८४ क्वार्टरकरीता ४४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या चारही पोलीस ठाण्यातील २६२ पोलीस कर्मचाºयांना हक्काची वसाहत मिळणार आहे.
जमिनीची होती अडचण
पोलिसांची वसाहत निर्माण करण्यासाठी जमिनीची अडचण होती. रावणवाडी येथील जमीन वनविभागाची असल्याने तिथे समस्या निर्माण झाली होती. या चारही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसाठी आता जमिनीची समस्या मार्गी लागली आहे.
फेज-२ मध्ये पुन्हा चार पोलीस ठाणे
पहिल्या टप्यात गोंदिया जिल्ह्यातील १६ पैकी ४ पोलीस ठाणे घेण्यात आले. दुसऱ्या टप्यात आमगाव, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव व नवेगावबांध या चार पोलीस ठाण्याच्या इमारती व कर्मचाऱ्यांच्यासाठी वसाहती निर्माण केल्या जाणार आहेत.त्यासाठी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू आहे.