राज्यातील १७०० तलाठ्यांची पदे भरली जाणार; डिसेंबरअखेरीस भरती प्रक्रिया होणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:16 IST2025-11-04T20:14:56+5:302025-11-04T20:16:24+5:30
रिक्त पदांमुळे येत होत्या अडचणी : तलाठी संघटनेने सुद्धा वेधले होते भरतीकडे लक्ष

1700 Talatha posts to be filled in the state; Recruitment process to begin by December end
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्याच्या महसूल विभागातील तलाठ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. सध्या तलाठ्यांच्या संख्येपेक्षा कामाचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. त्यामुळे नागरिकांना कागदपत्रांची कामे वेळेत मिळत नाहीत. मात्र, डिसेंबरअखेरीस राज्यातील तलाठ्यांच्या १७०० पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भरती झाल्यानंतर तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, तसेच नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागतील. ही भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठीही मोठा दिलासा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा
महसूल विभागातील पात्र सेवकांसाठीही राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना याचा लाभहोणार आहे.
डिसेंबरअखेरीस तलाठ्यांची १७०० पदे भरणार
राज्यातील तलाठ्यांच्या १७०० रिक्त पदांची भरती डिसेंबरअखेरीस सुरू होण्याबाबत चर्चा सुरू आहे. पदभरतीमुळे कामाचा ताण कमी होईल आणि तलाठ्यांवर नागरिकांच्या कामाचा प्रेशर कमी होईल.
'पेसा' क्षेत्रात कंत्राटी नियुक्ती
'पेसा' क्षेत्रातील गावांमध्ये कामकाज सुरळीत करण्यासाठी कंत्राटी तलाठ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तातडीने सुविधा मिळतील.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना दिलासा
मागील अनेक दिवसांपासून तलाठी भरती होत नसल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण भरतीची प्रतीक्षा करीत आहेत. आता तलाठ्याच्या जागा निघाल्या तर त्यांना दिलासा मिळणार आहे.
तलाठ्यांची पदे रिक्त
जिल्ह्यातही तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एका तलाठ्याकडे दोन सज्जाचा कारभार दिला आहे. ही भरती प्रक्रिया झाल्यास जिल्ह्यातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
नागरिकांची कामे वेगाने मार्गी लागणार
तलाठ्याकडे नेहमीच शेतकरी, नागरिकांचे कामे पडत असतात. मात्र, एका तलाठ्याकडे दोन ते तीन सज्जे असल्याने ते दररोज येऊ शकत नाही. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, जागा भरल्याने जमीन, महसूल, कागदपत्रे आणि इतर सरकारी कामे आता वेगाने पूर्ण होतील.
एका तलाठ्याकडे तीन तीन सज्जे
सध्या एका तलाठ्याकडे दोन ते तीन सज्जांची जबाबदारी दिली आहे. परिणामी, तलाठ्यांना कर्तव्य बजावताना मोठी दमछाक होत आहे. नवीन भरतीमुळे प्रत्येक तलाठ्याचे काम हलके होईल.
"मागील बऱ्याच दिवसांपासून आज ना उद्या जागा निघतील, या आशेवर स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहोत. तलाठ्यांच्या जागा निघतील अशी चर्चा आहे. पण प्रत्यक्षात जाहिरात निघून प्रामाणिक भरती होईल तेव्हाच खरे. आमचे प्रयत्न सुरू आहेत."
- सुभाष थेर, युवक