युवकांनी सामुदायिक शेतीकडे वळावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:15 IST2025-10-08T11:14:22+5:302025-10-08T11:15:15+5:30
साखळी रवींद्र भवनात सहकार खाते व जलस्रोत खात्यातर्फे सेवा पंधरवडानिमित्त शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

युवकांनी सामुदायिक शेतीकडे वळावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : सरकार शेतीसाठी मोठा खर्च करत आहे. शेतकऱ्यांनीही शेतीबाबत आस्था दाखवायला हवी. शेतकऱ्यांनी आता शेतात उतरून शेती केली नाही, तर पुढील पिढी शेतात उतरणार नाही. युवा पिढी केवळ मोबाइलमध्ये गुंतलेली असते. त्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करून शेतात उतरवायला हवे. सामुदायिक शेतीची संकल्पना त्यांच्या डोक्यात घालायला हवी, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
साखळी रवींद्र भवनात सहकार खाते व जलस्रोत खात्यातर्फे सेवा पंधरवडानिमित्त शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार दिव्या राणे, आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर, जि.पं. सदस्य गोपाळ सुर्लकर, शंकर चोडणकर, प्रदीप रेवोडकर, महेश सावंत, देवयानी गावस, जलस्रोतचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, फलोत्पादन महामंडळाचे एमडी संदीप फळदेसाई, राज्य बँकेचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर उपस्थित होते.
'शेतकऱ्यांकडे लाखो चौ. मी. जागा पडून'
मुख्यमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांकडे लाखो चौ. मी. जागा पडून आहे. सरकारने आमोणा गावात ४२ कोटी खर्चुन बांध बांधला. पण शेतकरी शेतात उतरत नाही. राज्यात कोट्यावधी रूपयांचा गुरांचा चारा बाहेरील राज्यातून आणावा लागतो. आपल्या खुल्या जागांमध्ये चारा जरी उगवला तरी शेतकरी फायद्यात येऊ शकतो. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणारे देशातील गोवा हे एकमेव राज्य आहे. मात्र शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.