अटलबिहारी वाजपेयींचा युवांनी आदर्श घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 07:41 IST2025-12-29T07:40:25+5:302025-12-29T07:41:49+5:30
साखळी भाजपतर्फे अभिवादन, वाजपेयींनी देशासाठी दिलेले योगदान बहुमूल्य

अटलबिहारी वाजपेयींचा युवांनी आदर्श घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जीवनकार्य हे संघर्षमय व प्रेरणादायी आहे. अनेक खडतर प्रसंग झेलत त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठी भरारी घेण्यासाठी प्रेरणा दिली. राष्ट्र प्रथम या तत्वावर चालणारे भाजपचे कार्य युवावर्गात नेहमी नवचेतना निर्माण करणारे आहे. साखळी मतदारसंघातही जुने असंख्य कार्यकर्ते असून अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे. त्यांनी वाजपेयींचा आदर्श जपताना नवी ऊर्जा प्राप्त करावी. वाजपेयी हे कवी मनाचे पंतप्रधान होते. त्यांनी युवावर्गात नवचेतना भरण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळीत केले.
अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र भवनात करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कारापूर सर्वण जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, पाळी जिल्हा पंचायत सदस्य सुंदर नाईक, गोपाळ सुर्लकर, स्वाती माईणकर, सुभाष मळीक, साखळी भाजप अध्यक्ष रामा नाईक व इतरांची उपस्थिती होती.
माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी देशासाठी केलेले कार्य फार मोठे आहे. या कार्याची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याला मिळावी, यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन सतत केले जाईल. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नाईक तर गोपाळ सुर्लकर यांनी आभार मानले.
जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान
यावेळी राजाराम परब, अनंत गावस, बंडोपंत सेटगे, लक्ष्मण नार्वेकर, दामोदर भोमकर, शशिकांत नाईक, दत्ताराम मांद्रेकर, आनंद वेरेकर या पाळी मतदारसंघातील जुन्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला.