इफ्फीत कला, संस्कृती दर्शन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:31 IST2025-11-16T12:30:12+5:302025-11-16T12:31:31+5:30
पाच चित्रपटांच्या निवडीसह गोमंतकीय सांस्कृतिक परेड

इफ्फीत कला, संस्कृती दर्शन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यंदाच्या वर्षी २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोमंतकीय कला व संस्कृतीचे दर्शन होणार आहे. गोवा मनोरंजन संस्थेने संकलित केलेल्या गोवा विभागासाठी ५ चित्रपटांची निवड यंदा केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री डॉ. एल. मुरुगन, पीआयबीच्या संचालक स्मिथा शर्मा व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, यंदाच्या इफ्फीचा जास्तीत जास्त फायदा स्थानिकांना व्हावा, यासाठी आम्ही इफ्फीचा भव्य उद्घाटन सोहळा आयनॉक्सच्या खुल्या सभागृहात केला आहे. उद्घाटनापूर्वीची इफ्फी परेड दुपारी ३.३० वाजता जुने जीएमसी भवन येथून सुरू होणार आहे. राज्यातील कला, संस्कृती, भारतीय सिनेमा आणि राज्यातील कलात्मकता यांचे दर्शन परेडमध्ये घडणार आहे.
या परेडचे कार्यक्रम दोन विभागात होणार आहेत. विभाग १ मध्ये गोवा सांस्कृतिक गट व चित्ररथ मिरवणूक असणार. यामध्ये १२ गट सहभागी होणार आहेत. तसेच विभाग २ मध्ये प्रॉडक्शन हाऊसेस, मीडिया व क्रिएटिव्ह इंडस्ट्री यांचे चित्ररथ असणार. यात एकूण ११ चित्ररथ असणार आहेत.
२७० चित्रपटांची पर्वणी
मंत्री डॉ. एल. मुरुगन, म्हणाले, इफ्फीच्या ५६ व्या महोत्सवात ८४ देशांतील २७० चित्रपटांची पर्वणी मिळणार आहे. यामध्ये १३ जागतिक प्रीमिअर, ५ आंतरराष्ट्रीय प्रीमिअर आणि ४४ आशियाई प्रीमिअरचा समावेश आहे. महोत्सवाची सुरुवात ब्राझीलमधील दिग्दर्शक गेब्रिएल मस्कारो यांच्या द ब्ल्यू ट्रेल या विज्ञान-काल्पनिक चित्रपटाने होणार आहे. यंदाच्या इफ्फीत जपान कंट्री-ऑफ-फोकस, स्पेन भागीदार देश, तर ऑस्ट्रेलिया स्पॉटलाईट देश म्हणून निवडण्यात आला आहे. महोत्सवात महिला दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले ५० पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
रजनिकांत यांना विशेष सन्मान
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता रजनिकांत यांनी पूर्ण केलेल्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.