लेखकाचा स्वाभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:10 IST2025-11-20T09:10:18+5:302025-11-20T09:10:49+5:30
गांक नायक या तरुण नाट्य लेखकाने कला अकादमीचा नाट्यलेखन पुरस्कार परवा नाकारला.

लेखकाचा स्वाभिमान
लेखक, साहित्यिक, कलाकार यांच्यावर स्वाभिमान दाखवायची वेळ येते तेव्हा तो दाखवावाच लागतो. विशेषतः सरकारी यंत्रणेसमोर नमून चालत नसते. युगांक नायक या तरुण नाट्य लेखकाने कला अकादमीचा नाट्यलेखन पुरस्कार परवा नाकारला. तसे पत्र युगांकने कला अकादमीच्या अध्यक्षांना सादर केले आहे. एखादा लेखक पुरस्कार नाकारतो, असे सहसा कधी घडत नाही. पुरस्कार व सत्कारांसाठी रांगेत उभे असलेले अनेक जण दिसतात. साहित्य अकादमी पुरस्काराचा टिळा एकदा तरी आपल्या कपाळी लागावा; म्हणून पूर्वी काही कवी, लेखक प्रचंड धडपडायचे. एकमेकांविरुद्ध आगपाखडही करायचे.
अर्थात गोव्यात जे कोंकणीबाबत घडतेय ते काही प्रमाणात मराठीबाबतही घडतेय, पण कोंकणी लेखन क्षेत्रात पुरस्कारांची हौस जास्तच आहे. दोन पुस्तके लिहिली की पुरस्कार मिळायलाच हवा, असा अट्टहास युवकांकडून धरला जातो, असा अनुभव अनेकदा येतो. या पार्श्वभूमीवर युगांक नायकची कृती उठून दिसते. लेखक सॉफ्ट टार्गेट होऊ नयेत, ही युगांकने मांडलेली भूमिका कुणालाही पटेल अशीच आहे. कला अकादमीने आयोजित केलेल्या ५०व्या कोंकणी नाट्यस्पर्धेचा निकाल परवा जाहीर झाला. मात्र नाट्यलेखन पुरस्काराबाबत विचित्र पायंडा कला अकादमीने घातला.
अकादमीने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कुणालाच दिला नाही. प्रथम क्रमांकासाठी एकही नाट्यसंहिता त्यांना पात्र वाटली नसावी. मात्र दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केले गेले. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार युगांक नायक यांना जाहीर झाला. नाट्यसंहिता लेखन श्रेणीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कुणालाच द्यायचा नाही व दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करायचा हा विचित्र प्रकार झाला. युगांक नायक यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. आपल्याला पुरस्कार नकोच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची जागा रिक्त ठेवून इतर क्रमांकाचे पुरस्कार देणे हा कलेचा व अभिव्यक्तीचाही अपमान आहे, असे युगांकना वाटते. युगांक स्वतंत्र विचारांचा कार्यकर्ता व लेखक आहे. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर सार्वजनिक चर्चा व्हायला हवी.
एकूणच कला अकादमीने व परीक्षकांनी त्यावर चिंतन करून आपली सुधारित भूमिका गोमंतकीयांसमोर मांडणे संयुक्तिक ठरेल. नाट्यसंहिता लेखनाकडे रंगभूमी दुर्लक्ष करू शकत नाही. किंबहुना रंगभूमीचा तो अलंकारच असतो हे कला अकादमीने लक्षात घेण्याची गरज आहे. आधीच चांगल्या नाट्यसंहितांचा दुष्काळ जाणवतो. कोंकणी लेखकांची क्रेडिबिलिटी जपण्यासाठी कला अकादमीने स्वतःच्या धोरणात आणि भूमिकेत बदल करण्याचीही गरज आहे. युगांक नायक जर पुरस्कार स्वीकारून गप्प राहिले असते तर कदाचित पुढील वर्षीही असेच घडले असते. अर्थात अजून अकादमीने आपला निर्णय बदललेला नाही. युगांकने निदान आवाज तरी उठवला आहे. त्यामुळे कालपासून सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली आहे. अनेकांनी युगांकच्या कृतीचे स्वागत केले.
कोंकणी नाट्य चळवळीला तर या निर्णयाने आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा विषय केवळ एका नाट्यलेखकाचा किंवा एका युगांकचा नाही. स्पर्धेविषयी अकादमी किंवा परीक्षक कशाप्रकारे विचार करतात, यावर विचार करण्यास ताज्या घटनेने सर्व लेखक व कलाकारांना भाग पाडले आहे. नाट्यस्पर्धेवेळी नाटकाच्या तांत्रिक बाजूंना जसे गांभीर्याने घेतले जाते, त्याचप्रमाणे नाट्यलेखनालादेखील संबंधितांनी गांभीर्याने घ्यायला हवे. निदान यापुढे तरी याचे भान आयोजकांना ठेवावे लागेल. केवळ सोपस्कार पार पाडावा म्हणून नाट्यस्पर्धा आयोजित करावी, असे होऊ नये. नाटके सादर झाल्यानंतर त्यावर कसलीच चर्चा होत नाही, अशी खंत काही जण व्यक्त करतात.
दरवर्षी स्पर्धेचा निकाल वादाचा विषय ठरतो, हेदेखील इथे लक्षात घ्यावे लागेल. नाट्य लेखनासाठी पोषक, अनुकूल वातावरण गोव्यात निर्माण व्हायला हवे. त्यासाठी कला अकादमीसारख्या संस्थांनी प्रोत्साहन द्यायचे असते. तरच अधिक दर्जेदार नाट्यसंहिता कोंकणी व मराठीत तयार होऊ शकतील. नाट्य लेखन म्हणजे टाइमपास नव्हे. किंवा ती सहजसोपी अशी गोष्टही नव्हे. महाराष्ट्रात अत्यंत सकस व दर्जेदार मराठी नाट्य लेखनाची मोठी परंपरा आहे. गोव्यात कोंकणी नाट्यसंहितांची निर्मिती करण्यासाठी पुढे येणाऱ्या तरुणांना अधिक प्रोत्साहन मिळायला हवे.