गुन्हेगारीची चिंता करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 09:06 IST2025-11-08T09:05:22+5:302025-11-08T09:06:49+5:30
सध्याच्या भाजप मंत्रिमंडळात मूळचे काँग्रेसवाले असलेले ६५ टक्के नेते आहेत.

गुन्हेगारीची चिंता करा
गोव्यात २०१२ साली मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. सत्ता बदल करत भाजपच्या हाती राज्याची धुरा सोपविली. २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा पराभव झाला. त्या काळात दिगंबर कामत मुख्यमंत्रीपदी होते. मात्र, कथित खनिज खाण घोटाळा, शिक्षण माध्यमाचा उग्र झालेला प्रश्न, तिकीट वाटपावेळी काँग्रेसने चूक करत घराणेशाहीला दिलेले निमंत्रण यामुळे भाजपचे फावले. (स्व.) मनोहर पर्रीकर यांच्या शब्दावर विश्वास ठेवून जनतेने भाजपकडे सत्ता सोपवली होती. आता दिगंबर कामत विद्यमान सरकारमध्ये मंत्री आहेत. फक्त त्यांच्याकडे खाण खाते नाही. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आहे.
सध्याच्या भाजप मंत्रिमंडळात मूळचे काँग्रेसवाले असलेले ६५ टक्के नेते आहेत. २०१२ साली काँग्रेस सरकारवर जे आरोप होत होते, तेच आरोप आता विद्यमान सरकारवर लोक करत आहेत. सरकारमधील काही नेते तर पूर्वीपेक्षा आता जास्त पराक्रमी आणि वादग्रस्त झाले आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या विषयावरून विद्यमान सरकार टिकेचे लक्ष्य बनले आहे. गुन्हे एवढे वाढलेत की, पोलिसांची नुसती धावपळ सुरू आहे. दरोडेखोर दरोडा घालून आरामात गोव्याबाहेर पसार होतात.
खुनी एकाचवेळी दोन खून करून रेल्वेने गोव्याबाहेर जातात. चोऱ्यांचे सत्र तर सर्व गावांमध्ये सुरू आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या पळविल्या जातात. किती चोऱ्यांचा आणि दरोड्यांचा छडा लागतो? कागदोपत्री दाखवण्यापुरते कुणाला तरी पकडले जाते. रामा काणकोणकर या सामाजिक कार्यकर्त्यांवर यापूर्वी प्राणघातक हल्ला झाला. पण, मास्टरमाइंड पकडला गेला का? त्या हल्ल्यानंतर विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या मालिका राज्यभर सुरू आहेत.
मोरजी-पेडणे येथील ज्येष्ठ नागरिक उमाकांत खोत यांचा खून झाला. लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या दबावामुळेच शेवटी पोलिसांनी चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला. तिघांना अटक केली गेली. गुरुवारी पहाटे बार्देशातील साळगाव येथे दुहेरी खुनाची घटना घडली. रिचर्ड डिमेलो व अभिषेक गुप्ता यांचा खून झाला. दुचाकीवर बसून संशयित आरोपी थिवी रेल्वे स्थानकापर्यंत गेला आणि पसार झाला. तो पुढे पकडलाही जाईल.
मात्र, राज्यातील कायदा व सुव्यवस्था खूप खराब झाली आहे, हे मान्य करावेच लागेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल-परवा बोलताना शब्दांची कसरत केली. गेली १४ वर्षे भाजपकडे सत्ता आहे, हे दामू नाईक यांनी विचारातच घेतले नाही. त्यांनी राज्यातील आजच्या स्थितीला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, अशा अर्थाचे विधान मीडियाशी बोलताना केले. २०१२ नंतर काँग्रेस पक्ष कधीच सत्तेत आलेला नाही. मग, काँग्रेसला दोष कसा जातो? पूर्वीच्या काळी काँग्रेसने जे बी पेरले होते, त्याची फळे राज्याला आता भोगावी लागतात, असाही दावा दामू नाईक यांनी केला आहे.
म्हणजे, काँग्रेस सरकारच्या पूर्वीच्या धोरणांमुळे आता भाजपच्या राजवटीत गुन्हे घडू लागले आहेत, असे दामू नाईक यांना सूचवायचे आहे का? एकंदरीत पूर्ण दावाच हास्यास्पद वाटतो. पूर्वीच्या सरकारला दोषी ठरवत आणखी पन्नास वर्षेदेखील काढता येतील. मात्र, कायदा व सुव्यवस्था ठीक करण्याची जबाबदारी आताचे राज्यकर्ते घेणार आहेत की नाही? गेल्या १४ वर्षांत राज्यात खूप विकास झाला, असेही दामू नाईक म्हणतात. त्यासाठी पूल बांधले, महामार्ग बांधले वगैरे उदाहरण ते देतात. आता फेरीबोटींचा वापर कमी झालाय आणि पुलामुळे वाहतुकीची सोय झाली, हे मान्यच आहे. साधनसुविधा निर्माणाचे श्रेय भाजप सरकारला द्यावेच लागेल. मात्र, जमिनींच्या वादातून किंवा अन्य कारणास्तव जे खून पडत आहेत, डॉक्टरांच्या घरांवर जे दरोडे पडत आहेत किंवा रोज ज्या चोऱ्या, घरफोड्या होत आहेत, त्यासाठी पोलिस दलात मोठ्या सुधारणा कराव्या लागतील, हे सरकारला मान्य करावे लागेल.
प्रदेशाध्यक्ष या नात्याने दामू नाईक यांनी याबाबत सरकारला थोडे मार्गदर्शन करावे. मटक्याच्या ठिकाणी छोटासा छापा टाकून एखाद्या गरिबाला पकडून पोलिस मोठी कारवाई केल्याची जाहिरात करतात, चोरीला गेलेले मोबाइल मोठा गाजावाजा करून मालकाला परत दिले जातात. त्यापेक्षा गुन्हेगारी रोखण्यासाठी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवावा लागेल. पोलिसांचे इंटेलिजन्स सुधारावे लागेल. काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या कराव्या लागतील. हे काम काँग्रेस करणार नाही, तर भाजप सरकारलाच ते करावे लागेल.