सरकारी योजनातून महिलांनी स्वावलंबी बनावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:38 IST2026-03-08T12:36:56+5:302026-03-08T12:38:20+5:30
फोंड्यात महिला दिन साजरा

सरकारी योजनातून महिलांनी स्वावलंबी बनावे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र व गोवा सरकार विविध योजना आहेत. या योजनांचा लाभघेऊन महिलांनी सर्व क्षेत्रांत प्रगती साधावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
बेतोडा-फोंडा येथील सनग्रेस गार्डनमध्ये ऑल गोवा वूमन फेडरेशन व रवी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, राजीव कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक, नगरसेविका विद्या पुनाळेकर, नगरसेवक रॉय नाईक, आनंद नाईक, रूपक देसाई, कुर्टी पंचायतीचे सरपंच नावेद तहसीलदार, जिल्हा पंचायत सदस्य रितेश गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी तीन ठिकाणी सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून वसतिगृह उभारण्यात येतील, त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तसेच शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना सॅनिटरी पॅड देण्याची योजना राबवण्यात आली आहे. याशिवाय आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुली व महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याचीही योजना सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी सावईकर यांनीही मनोगत व्यक्त केले. महिलांना एकत्र आणण्यासाठी स्वर्गीय रवी नाईक दरवर्षी महिला मेळावा आयोजित करत असत आणि त्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात नरेंद्र सावईकर, रितेश नाईक, रॉय नाईक, सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर व नावेद तहसीलदार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उषा नाईक, डॉ. पौर्णिमा उसगावकर, डॉ. श्वेता खांडेपारकर, भक्ती भानुषाली, यशस्वती गायकवाड, फातिमा मुल्ला, भाग्यवती गावडे, श्रद्धा शिरोडकर, शैला बोरकर, ललिता सावंत, समृद्धी पाटील, सुजाता सतरकर, प्रमिला फर्नांडिस, टीना फर्नाडिस, काशी गावडे व सुमती बेतकीकर यांचा समावेश होता.