गोव्यातील 260 खाण अवलंबित आंदोलनासाठी दिल्लीला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 14:22 IST2018-12-05T14:06:48+5:302018-12-05T14:22:27+5:30

11 व 12 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर तसेच 13 रोजी जंतर-मंतरवर हे आंदोलक निदर्शने करणार आहेत.

Will take up mining resumption issue with PM Modi, governor tells dependants | गोव्यातील 260 खाण अवलंबित आंदोलनासाठी दिल्लीला रवाना

गोव्यातील 260 खाण अवलंबित आंदोलनासाठी दिल्लीला रवाना

ठळक मुद्दे11 व 12 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर तसेच 13 रोजी जंतर-मंतरवर हे आंदोलक निदर्शने करणार आहेत.1000 खाण अवलंबित आंदोलनांमध्ये भाग घेतील, असे गोवा मायनींग पीपल्स मायनिंग फ्रंटचे नेते यांनी पुती गावकर यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते काँग्रेसचे बाबू कवळेकर,  प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच काँग्रेसचे आमदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

पणजी - गोव्यातील खाणी पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती तसेच अन्य आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी दिल्लीत येत्या 11, 12 आणि 13 रोजी होणाऱ्या आंदोलनात भाग घेण्यासाठी 260 खाण अवलंबितांची पहिली तुकडी पहाटे मंगला एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाली.

11 व 12 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर तसेच 13 रोजी जंतर-मंतरवर हे आंदोलक निदर्शने करणार आहेत. एकूण सुमारे 1000 खाण अवलंबित आंदोलनांमध्ये भाग घेतील, असे गोवा मायनींग पीपल्स मायनिंग फ्रंटचे नेते यांनी पुती गावकर यांनी लोकमतला सांगितले. या आंदोलनाला काँग्रेसने आधीच पाठिंबा दिला आहे. शिवाय गोवा सुरक्षा मंच व गोवा फॉरवर्ड पक्षांचाही पाठिंबा आहे. गावकर म्हणाले की, गेल्या दोन दिवसात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांची भेट घेऊन त्यांना या आंदोलनास पाठिंबा द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे.

विरोधी पक्षनेते काँग्रेसचे बाबू कवळेकर,  प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच काँग्रेसचे आमदार या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, अवलंबितांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या प्रश्नावर भेट घेऊन द्यावी, अशी विनंती केली. राज्यातील खाणी बंद असल्याने सुमारे साडेतीन लाख लोकांचा रोजगार बुडालेला आहे आणि याबाबतीत युद्ध पातळीवर हालचाली होणे अपेक्षित असल्याचे शिष्टमंडळाने राज्यपालांना पटवून दिले त्यावर राज्यपालांनी येत्या दोन दिवसात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून अपॉइंटमेंट घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. दिल्लीत आंदोलन करूनही एम एम डी आर कायद्यात दुरुस्ती किंवा तत्सम हालचाली न झाल्यास दिल्लीहून परतल्यानंतर 17 किंवा 18 रोजी आंदोलनाची पुढील कृती जाहीर करू, असा इशारा गावकर यांनी दिला आहे. खाणींचा प्रश्न गंभीर बनत चालला असूनही राज्यातील तिन्ही खासदार हा विषय योग्यरीत्या केंद्र सरकारकडे मांडण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप करताना गावकर यांनी या खासदारांची क्षमताच नाही, अशी तोफ डागली आहे. ते म्हणाले की 'आम्ही जे वारंवार सांगत आलो आहोत तेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 24 सप्टेंबर रोजी केंद्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आम्ही योग्य ते सांगत आहोत ते योग्यच होते हे स्पष्ट होते'.

केंद्रात मंत्री सुरेश प्रभू यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे, असा उल्लेख गावकर यांनी आवर्जून केला आहे. दरम्यान, गोवा सुरक्षा मंच प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनीही आंदोलकांची भेट घेऊन 13 रोजी दिल्लीत होणाऱ्या जंतरमंतरवरील आंदोलनात आपण सहभागी होईन. तसेच भारत स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही या आंदोलनात सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी आपण बोलणार असून समर्थन मिळवू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

Web Title: Will take up mining resumption issue with PM Modi, governor tells dependants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.