योग्यवेळी योग्य ते बोलेन: गोविंद गावडे; 'जर आणि तर'च्या गोष्टी आताच कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:03 IST2025-07-01T13:03:03+5:302025-07-01T13:03:52+5:30
येत्या विधानसभा अधिवेशनात त्यांची भूमिका काय असेल याबाबतही उत्सुकता आहे.

योग्यवेळी योग्य ते बोलेन: गोविंद गावडे; 'जर आणि तर'च्या गोष्टी आताच कशाला?
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रियोळमधून अपक्ष म्हणून लढणार का ?, येत्या विधानसभा अधिवेशनात कोणती भूमिका घेणार ? या प्रश्नांवर आमदार गोविंद गावडे यांचे एकच उत्तर आहे. ते म्हणाले की, योग्य वेळी योग्य भूमिका मी घेईन.' २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट न दिल्यास कोणता पवित्रा घेतील याबाबत लोकांना उत्कंठा आहे. त्याचबरोबर येत्या विधानसभा अधिवेशनात त्यांची भूमिका काय असेल याबाबतही उत्सुकता आहे.
मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर गावडे यांनी पक्षनेतृत्वावर दुगाण्या झाडल्या होत्या. 'उचलली जीभ लावली टाळ्याला', असाच प्रकार घडल्याची टीका केली होती. त्यावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी उत्तर देताना ही कारवाई तडकाफडकी झालेली नसल्याचे सांगत याआधी दोन ते तीनवेळा गावडे यांना बेशिस्तीबद्दल समज दिल्याचा दावा केला होता. दामू यांनी केलेल्या या दाव्याबद्दल विचारले असता गावडे यांनी त्यावरही 'मला एवढ्यात यावर काही बोलायचे नाहीय. योग्यवेळी भाष्य करीन, असे 'लोकमत'ला सांगितले. भाजपने तिकीट नाकारली तर काय भूमिका घेणार? असे विचारले असता गावडे म्हणाले की, निवडणूक अजून लांब आहे. जर आणि तरच्या गोष्टी आता नको. योग्यवेळी योग्य ती कृती मी करीन.'
दरम्यान, २०१७ ची विधानसभा निवडणूक गावडे यांनी प्रियोळमधून अपक्ष म्हणून लढविली होती, त्यावेळी ते विजयी झाले. गावडे यांना १५,१४९ मते मिळाली होती तर नजीकचे प्रतिस्पर्धी मगोपचे दीपक ढवळीकर यांना १०,४६३ मते प्राप्त झाली होती. त्यानंतर २०२२ ची विधानसभा निवडणूक गावडे यांनी भाजपच्या तिकिटावर लढवली. त्यांना ११,०९१ तर प्रतिस्पर्धी मगोपचे दीपक ढवळीकर यांना १०,८०६ मते मिळाली होती.
प्रियोळमध्ये हॅट्ट्रिक नाहीच
प्रियोळ विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा कोणीही विजयी झालेला नाही. गावडे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असतील व त्यांना अग्निदिव्यातूनच जावे लागेल. ११ जानेवारी २०२२ रोजी गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याआधी ते अपक्ष होते.
काय म्हणाले होते गावडे?
जानेवारी २०२२ मध्ये भाजप प्रवेशाच्यावेळी गावडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, अपक्ष म्हणून मला असे जाणवले की, काही अडचणी आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती राजकीय पक्षात असते तेव्हा पक्ष संघटना त्या व्यक्तीच्या पाठीशी असते. मनुष्यबळ खूप महत्त्वाचे असते म्हणून मी पक्षप्रवेश केलेला आहे.'
'शंभर मंत्रिपदे गेली तरीही हक्कांसाठी पेटून उठू'
माझे मंत्रिपद गेले, याचे मला काडीमात्र दुःख नाही. कारण, आपण यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना मी सांगितले होते की, "जे मंत्रिपदासाठी आसुसलेले आहेत त्यांचे समाधान होण्यासाठी माझे मंत्रिपद काढून त्यांच्या गळ्यात घाला'. मला मंत्रिपद गेल्याची अजिबात पर्वा नाही. अशी शंभर मंत्रिपदे माझ्या हातून निसटली तरीही त्याची मला पर्वा नाही, परंतु माझ्या बहुजन समाजावर जेव्हा अन्याय होईल, तेव्हा मी गप्प बसणार नाही. आम्ही आमच्या हक्क, मागण्यांसाठी पेटून उठू, असा निर्धार माजीमंत्री तथा विद्यमान आमदार गोविंद गावडे यांनी केला.
आमदार गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर उटा संघटनेने राज्यभर आदिवासी समाजाच्या बैठकांचा सपाटा लावलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी उशिरा करमळी-तिसवाडी येथे उटाची जनजागृती सभा झाली. यावेळी उटाचे निमंत्रक या नात्याने गावडे बोलत होते. त्यांच्यासोबत उटाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रकाश वेळीप, कार्याध्यक्ष विश्वास गावडे, डॉ. उदय गावकर, दुर्गादास गावडे, सुभाष कुट्टीकर, दया गावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यापूर्वी सांगे, केपे, फोंडा, सासष्टी येथे प्रमुख कार्यकत्यांच्या बैठका झाल्या होत्या.
षडयंत्र रचणाऱ्यांपासून सावध राहा : विश्वास गावडे
उटा संघटनेने यापूर्वी काय मिळवले, काय गमावले याचा विचार न करता आम्हाला आमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी जागृत राहावे लागणार आहे. समाजातील काही लोक स्वार्थासाठी समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र रचत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. त्यांना आमच्या समाजात खिंडार पाडण्यासाठी पेरले आहे. समाजबांधवांनी एकजूट राहावे, असे आवाहन विश्वास गावडे यांनी केले.
सरकार दरबारी न्याय मागणार : प्रकाश वेळीप
उटा संस्थेच्या माध्यमातून आम्ही वंचित आदिवासी समाजाला न्याय देत आलो आहेत. यापुढेही आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सरकार दरबारी न्याय मागणार आहोत, असे प्रकाश वेळीप यांनी यावेळी सांगितले.
'संघर्ष केल्याशिवाय बहुजन समाजाला काहीच मिळणार नाही'
आमदार गावडे म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा' हा मंत्र दिला आहे. या त्यांच्या मंत्राचे तंतोतंत पालन करण्याची आज गरज आहे. त्यासाठी आम्ही सर्व बहुजन समाज संघटित होऊ व नंतरच संघर्षाची दिशा ठरवू, संघर्ष केल्याशिवाय बहुजन समाजाला काहीच प्राप्त होणार नाही.