गोव्याला आणखी एक ‘वंदे भारत’ मिळणार? कोणत्या मार्गावर चालवणार, किती वेळात पोहोचणार? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 19:44 IST2026-02-24T19:32:08+5:302026-02-24T19:44:37+5:30
New Vande Bharat Express Train To Goa: मडगाव येथून मुंबई आणि मंगळुरू मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. नवीन रुट कोणता?

गोव्याला आणखी एक ‘वंदे भारत’ मिळणार? कोणत्या मार्गावर चालवणार, किती वेळात पोहोचणार? पाहा
New Vande Bharat Express Train To Goa: वंदे भारत ट्रेनचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होताना दिसत आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू करण्यावर भारतीय रेल्वे भर देत आहे. आताच्या घडीला गोव्यात दोन वंदे भारत ट्रेनच्या सेवा सुरू असून, गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आताच्या घडीला मुंबई आणि मंगळुरू या दोन मार्गांसाठी मडगाव येथून वंदे भारत ट्रेन सुटतात. ट्रेन क्रमांक २२२३० मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारत दुपारी २.३५ वाजता सुटते आणि रात्री १०.३५ पर्यंत मुंबईत पोहोचते. ही ट्रेन आठवड्यात सहा दिवस धावते. तसेच ट्रेन क्रमांक २०६४५ मडगाव-मंगळुरू वंदे भारत ही ट्रेन सामान्यतः सायंकाळी ६:१० वाजता मडगाव येथून सुटते आणि रात्री १०:४५ पर्यंत मंगळूर सेंट्रलला पोहोचते. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावते.
गोव्याला आणखी एक ‘वंदे भारत’ मिळणार
रेल्वे लवकरच बंगळुरू ते मडगाव गोवा या मार्गावर सेमी हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेने याबाबतचा एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केल्याचे म्हटले जात आहे. या मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर ट्रेनचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही नवीन वंदे भारत ट्रेन बंगळुरूमधील यशवंतपूर आणि गोव्यातील मडगाव जंक्शनपर्यंत धावेल. ही ट्रेन यशवंतपूरहून सकाळी ६:०५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ७:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन मडगावहून सकाळी ५:३० वाजता निघेल आणि सायंकाळी ६:४० वाजता यशवंतपूरला पोहोचेल. ही ट्रेन अंदाजे १३ तासांत हे अंतर कापेल.
दरम्यान, ही ट्रेन मंगळुरू जंक्शन आणि मंगळुरू सेंट्रल स्टेशन सोडून पडिल बायपासवरून जाईल. यासंदर्भात झोनकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. यावर सविस्तर चर्चा सुरू आहे आणि सर्व बाबींवर सहमती झाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल. लवकरच या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळेल अशी अपेक्षा आहे. वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी दोन रेक आवश्यक आहेत. त्यामुळे, दोन्ही रेक उपलब्ध होताच, ट्रेनच्या कामकाजाची अधिकृत सूचना जारी केली जाईल, असे सांगितले जात आहे.