पुढील विधानसभा निवडणूक पेडणेतून लढवणार: बाबू आजगावकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 07:19 IST2025-08-21T07:19:06+5:302025-08-21T07:19:43+5:30
लोकांच्या पाठिंब्यामुळेच घेतला निर्णय

पुढील विधानसभा निवडणूक पेडणेतून लढवणार: बाबू आजगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : आमदार जीत आरोलकर असो किंवा आमदार प्रवीण आर्लेकर कोणी काहीही म्हणाले, तरी मला फरक पडणार नाही. येत्या २०२७ विधानसभा निवडणूक मी पुन्हा पेडणे मतदारसंघातून लढवणारच. यासाठी पेडणेतील लोकांनी मला आतापासूनच पाठिंबा दिला आहे, असे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सोशल मीडियावर एका चॅनलला माहिती देताना सांगितले.
बाबू आजगावकर म्हणाले, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या मांद्रे मतदारसंघाचा विचार करावा, त्यांनी पेडणेकरांची काळजी करू नये. आपण मंत्रिपदी असताना पेडणेचा सर्वांगीण विकास केला आहे. अनेक प्रकल्प आणले, म्हणूनच पेडणेची जनता अजून आमच्या पाठीशी आहे. आता जीत हे आर्लेकरांना पाठिंबा देण्यासाठी माझ्याविषयी बोलत आहेत. पण, मला त्याचा काहीच परिणाम होणार नाही. ते कितीही बोलले तरी मी पुढील निवडणूक पेडणे मतदारसंघातून लढवणार आहे.
आजगावकर म्हणाले, जीत आरोलकर यांनी निवडून येण्यापूर्वी जीवरक्षकांना सेवेत कायम करणार तसेच अन्य विविध आश्वासने दिली होती. अद्याप ती पूर्ण केली नाहीत. आता ते पुन्हा आश्वासने देत आहेत. त्यामुळे अगोदर दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. नंतर पेडणे मतदारसंघाच्या विकासावर बोलावे.
पेडणेचा किती विकास केला हे जनतेला माहिती आहे. आर्लेकरांनी काय विकास केला आहे, हे जनतेने पाहिले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पुन्हा निवडणूक लढवणार आहे.