'आम आदमी'चे गोवा प्रमुख का सोडतात पक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:49 IST2026-01-06T14:49:34+5:302026-01-06T14:49:34+5:30
जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आप'च्या मतांमध्ये झालेली घट ही पक्षासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.

'आम आदमी'चे गोवा प्रमुख का सोडतात पक्ष?
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर, कार्यकारी निमंत्रक कृष्णा परब यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. 'आप'चे प्रमुख सातत्याने पक्ष का सोडत आहेत? पालेकर यांच्या राजीनाम्यामुळे गोव्यातील 'आप'मध्ये चौथ्यांदा वरिष्ठ पदाधिकाऱ्याने पक्ष सोडल्याची नोंद झाली आहे.
यापूर्वी 'आप'चे निमंत्रक असलेले एल्विस गोम्स यांनी वैचारिक मतभेदांचा हवाला देत पक्ष सोडला होता. त्यानंतर राहुल म्हांब्रे यांच्याकडे निमंत्रकपदाची जबाबदारी देण्यात आली; मात्र काही काळातच त्यांनीही अंतर्गत मतभेद आणि असहमतीमुळे पदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी प्तिमा कुतिन्हो यांनीही अल्पावधीतच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता पालेकर यांच्या राजीनाम्यामुळे नेतृत्वातील अस्थिरता पुन्हा समोर आली आहे.
प्रत्येक राजीनाम्यामागे वेगवेगळी कारणे पुढे आली असली, तरी त्यामागे पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धतीबाबत असलेली नाराजी दिसून येते. एल्विस यांनी पक्षातील निर्णय प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचा आरोप केला होता. म्हांब्रे यांनी मतभेदांमुळे पद सोडल्याचे सांगितले. पालेकर यांनी मात्र आपल्याला पदावरून हटविण्याची पद्धत अस्वीकारार्ह असल्याचे नमूद करत, पक्षात मतभिन्नतेला पुरेसा वाव दिला जात नसल्याचा आरोप केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस बरोबर युती करण्याचे आपले मत होते असे ते म्हणाले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'आप'ची गोव्यातील राजकीय रणनीतीही प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेषतः कांग्रेसचा मतदार आपल्याकडे वळविण्याचा पक्षाचा प्रयत्न अपेक्षित यश मिळवू शकलेला नाही, असे दिसून येते.
मतांमधील घट ठरली चिंतेची बाब
जिल्हा पंचायत निवडणुकीत 'आप'च्या मतांमध्ये झालेली घट ही पक्षासाठी चिंतेची बाब मानली जात आहे. या निवडणूक निकालांनी 'आप'च्या वाढीबाबत असलेले दावे वास्तवाच्या कसोटीवर उतरले नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, नेतृत्वातील सतत होणारे बदल, अंतर्गत मतभेद आणि स्पष्ट दिशेअभावी पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत होत आहे. निमंत्रक बदलत राहणे हे केवळ व्यक्तीगत कारणांपुरते मर्यादित नसून, पक्षाच्या निर्णयप्रणाली आणि कार्यसंस्कृतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे. गोव्यात स्वतःला एक सक्षम पर्याय म्हणून उभे करण्याचा 'आप'चा प्रयत्न सुरू असताना, वारंवार होणारे निमंत्रकांचे राजीनामे आणि घटती मते पक्षासमोर मोठे आव्हान उभे करत आहेत.