काँग्रेसचे खरे साथी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:38 IST2025-12-04T11:36:53+5:302025-12-04T11:38:35+5:30
गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीची हवा आहे. प्रक्रिया सुरू झालेली आहे. भाजपने बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. इतर पक्षदेखील कामाला ...

काँग्रेसचे खरे साथी कोण?
गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीची हवा आहे. प्रक्रिया सुरू झालेली आहे. भाजपने बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. इतर पक्षदेखील कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. गेले दोन महिने काँग्रेससह आरजी व गोवा फॉरवर्ड पक्षदेखील बोलत आलाय की, भाजपचा पराभव करावा हा विरोधी पक्षांचा हेतू आहे. यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवे. तसा आग्रह युरी आलेमाव, विजय व वीरेश बोरकरदेखील धरत आले आहेत. मात्र काँग्रेसने कालच्या मंगळवारी काही उमेदवार जाहीर करून टाकले आणि विरोधी आघाडीला घरघर लागणे सुरू झाले.
आरजीचे नेते मनोज परब व इतरांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आपली फसवणूक केली गेली, काँग्रेसने परस्पर उमेदवार रिंगणात उतरविले, असे आरजीच्या नेत्यांनी म्हटले आहे. एकंदरीतच विरोधक संघटीत होऊ शकत नाहीत, हा संदेश जनतेत गेला आहे. मुळात काँग्रेसची आरजीसह युती होणे कठीणच होते व आहे. विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष मर्यादित मतदारसंघांमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे त्या पक्षाला काँग्रेसची साथ देणे परवडते. किंबहुना विजयला जर राज्यस्तरावरील मोठा नेता व्हायचे असेल, तर गोवा फॉरवर्डला काँग्रेससोबतच जावे लागेल.
काँग्रेसचा हात पकडून विजय पुढे जात राहिले तर त्यातून कदाचित गोवा फॉरवर्डचीही वाढ होईल. शिवाय ख्रिस्ती मतदारांची सहानुभूती किंवा पाठिंबा मिळविणेही विजयला सुलभ होईल. आरजीचे तसे नाही. तो पक्ष बार्देश, सासष्टी, तिसवाडी, फोंडा अशा तालुक्यांत जास्त सक्रिय आहे. शिवाय तिथेच काँग्रेसचे पारंपरिक मतदार जास्त आहेत. आपली व्होट बँक जपणे हे सध्या काँग्रेससमोरचे आव्हान आहे. आरजीचे लाड करत काँग्रेस पुढे जाऊ शकणार नाही. किंबहुना गोवा फॉरवर्डचे देखील जास्त लाड करणे काँग्रेसला परवडणार नाही, हे त्या पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आले आहेच.
काँग्रेसने उमेदवार जाहीर करणे ही त्यांची राजकीय चूक नव्हे. मुळातच उमेदवार जाहीर करायला उशीर झालेला आहे. भाजपने ९० टक्के उमेदवार जाहीरही केले आणि प्रचारातही आघाडी घेतली आहे. अशावेळी विरोधक कोणता पोरखेळ खेळत बसले आहेत, असा प्रश्न मतदार विचारू शकतात. एकमेकांना दोष देत बसून जिंकता येत नाही.
आम्हाला फुटीर नकोत, फुटिरांना कोणत्याच पक्षाने प्रवेश देऊ नये, असे आरजीचे नेते वारंवार सांगत आहेत. गोवा फॉरवर्डने इजिदोर फर्नांडिस यांना पक्षात घेतल्यानंतर आरजीने वेगळा सूर लावला. मात्र, पूर्ण शुद्ध व सोज्वळ राजकारण गोवा फॉरवर्डला आणि काँग्रेसलाही परवडणार नाही. कारण, आताच दिसत आहे की काँग्रेसकडेदेखील सर्व झेडपी मतदारसंघांसाठी उमेदवार नाहीत. काँग्रेसने जी पहिली यादी जाहीर केली, त्यातील काही उमेदवार केवळ नावापुरते आहेत. त्यांच्याकडे किती मते आहेत, हे निवडणुकीत कळून येईलच.
आम आदमी पक्षाने स्वतःची स्वतंत्र वाट धरली, ही वास्तविक योग्य खेळी आहे. काँग्रेसच्या नादाला लागला असता तर आपच्या नेत्यांना अजूनही आपले उमेदवार जाहीर करता आले नसते. कदाचित आरजीप्रमाणेच आपदेखील गोंधळात सापडला असता. आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी शिक्षित युवा-युवतींना तिकीट दिले आहे. प्रचार कामही जोरात सुरू आहे असे दिसते. काँग्रेसपेक्षा आपण प्रभावी आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न आपने चालवला आहे.
काल विजय सरदेसाई बोलले की, विरोधकांची युती होणे आता सर्वस्वी काँग्रेसच्या हाती आहे. म्हणजे चेंडू काँग्रेसच्या कोर्टात आहे. सरदेसाई यांनी डिचोली, तिसवाडी, पेडणे व काणकोण या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी आपले उमेदवार निश्चित केले आहेत. मयेपासून खोर्लीपर्यंत व पैंगीणपासून मोरजीपर्यंत गोवा फॉरवर्ड पक्ष सक्रिय झाला आहे. काँग्रेसचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते थोडे अस्वस्थ आहेत. मात्र, याला उपाय नाही. विजयने खूप अगोदरच आपले उमेदवार हेरले व प्रचार काम सुरू केले.
राजकीय नेत्यांना अशा पद्धतीने आक्रमकपणे पुढे जावेच लागते. विरोधकांची जर युती झाली तरच भाजपवर दबाव येईल. मात्र, सध्या विरोधक विखुरलेले आहेत. आरजी व गोवा फॉरवर्ड काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. आपला खरा साथी कोण हे काँग्रेसला ओळखावे लागेल व त्यानुसार काही जागा इतरांसाठी सोडाव्या लागतील.