शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:40 IST2025-10-29T07:39:43+5:302025-10-29T07:40:37+5:30
पोलिसांनी ही बॅग जप्त केली आहे.

शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : गोव्याच्या दक्षिण सीमेवरील माजाळी येथील तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये तब्बल एक कोटी रुपयांची अवैध रोकड सापडली आहे. गोव्याहून बेंगळुरूला जाणाऱ्या बसमध्ये ही रोकड सापडली आहे. पोलिसांनी ही बॅग जप्त केली आहे.
वास्तविक बेकायदा दारू तस्करीसाठी तपासणी केली जात होती. मात्र, बेकायदा रोकड सापडली. मध्यरात्री पावसाचा जोर असतानाच ही खाजगी प्रवासी बस माजाळी येथे पोहोचली. तिथे अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून अगोदर पोळे चेक नाक्यावर व नंतर माजाळी चेकनाक्यावर तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान बसमधील प्रवाशांच्या बॅगा तपासल्या असता, राजस्थान येथील कल्पेश कुमार या प्रवाशाच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून कल्पेश कुमार आणि त्याचा सहकारी भामृकुमार याला ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेली रोकड ५०० रुपयांच्या नोटांमध्ये असून, तिचा मालक आणि स्त्रोत याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
'हवाला' कनेक्शन ?
कर्नाटकात दारू महाग असल्यामुळे गोव्याहून जाणाऱ्या वाहनांतून दारूची तस्करी होऊ नये यासाठी माजाळी नाक्यावर अबकारी खात्याकडून तपासणी केली जाते. या तपासणीवेळी ही रोकड सापडली. हा पैसा हवालाचा असल्याचा संशय आहे. चित्ताकुला कारवार पोलिस स्थानकाकडून तपास सुरू आहे. या रक्कमेचा हवाला नेटवर्कशी संबधही तपासून पाहिला जात आहे. तसेच गोव्यात या प्रवाशांचा कुणाशी व्यवहार झाला होता का? याचीही चौकशी केली जात आहे.