राज्यात लवकरच दुसरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 07:59 IST2025-05-09T07:57:59+5:302025-05-09T07:59:52+5:30
शिरोडा येथे कार्यकर्ता मेळाव्यात राज्यासह देशात पुन्हा कमळ फुलवण्यासाठी एकजूट होण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

राज्यात लवकरच दुसरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: राज्य विकासाच्या मार्गावर झपाट्याने वाटचाल करत आहे. येत्या काही काळात दक्षिण गोव्यात दुसरे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकास करण्यासाठी अखंडित इंटरनेटची सोय केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शिरोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यकर्त्यांनी राज्यात आणि देशात पुन्हा कमळ फुलवण्यासाठी एकजूट व्हा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसने केले नाही ते धाडस मोदींनी केले : सावंत
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात देशात काँग्रेस सरकार असताना पाकिस्तानमधील दहशतवादाला विरोध करण्याचे धाडस केले नाही. ते धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आपली लढाई ही कोणताही देश, धर्म, जात यांच्याविरोधात नसून दहशतवादाविरोधात आहे. ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व भारतीय नारी शक्तीने केले. भारतीय महिला ही भ्याड व अबला नसून सबला आहे हे यातून दिसून आले. दहशतवादाविरोधात यापुढेही लढाई लढण्यासाठी, दहशतवाद संपवण्यासाठी भारतामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.
गरजूंपर्यंत सरकारच्या सुविधा : शिरोडकर
सहकार मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेल्या खात्यातून लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दोन्ही खात्याच्या माध्यमातून गरजूपर्यंत सुविधा पोहोचवल्या जात आहेत.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांच्या जीवन समृद्धीचे ध्येय ठेवले आहे. यासाठी पंचायत, जिल्हा पंचायत निवडणूक असो वा विधानसभा, सर्व निवडणुकीमध्ये भाजपच्या नव्या व जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे.
व्यासपीठावर प्रदेशाध्याक्ष दामू नाईक, खासदार सदानंद तनावडे, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, प्रभारी अॅड. नरेंद्र सावईकर, शिरोडा भाजप मंडळाचे अध्यक्ष अक्षय गावकर, डॉ. गौरी शिरोडकर, सूरज नाईक, अवधूत नाईक, प्रभाकर गावकर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत. प्रदेशाध्यक्ष नाईक यांचा शाल, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ३० कार्यकर्त्यांची समितीही निवडण्यात आली. खासदार तानावडे व माजी खासदार सावईकर यांनी मनोगत व्यक्त केले.