दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ देऊ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 12:49 IST2025-11-23T12:48:45+5:302025-11-23T12:49:15+5:30
साखळीत दिव्यांगांना विविध उपकरणांचे वितरण, समान संधी मिळतेय हे समाधान

दिव्यांगांना सरकारी योजनांचा लाभ देऊ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: गोवा सरकारच्या दिव्यांग सबलीकरण खाते व दिव्यांग व्यक्ती आयोगाने राज्यातील सर्व भागांमधून शोधून काढत सुमारे ३ हजार दिव्यांग व्यक्तींना आवश्यक विविध उपकरणे प्रदान केली आहेत. गोव्याचे दिव्यांग सबलीकरण खाते व आयोग ही संगनमताने काम करीत असून गोव्यात एकही दिव्यांग व्यक्ती सरकारच्या या सोयीपासून अलिप्त राहू नये, याची गांभीर्याने काळजी घेत आहे, असे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
दिव्यांग घटकांना आवश्यक सर्व सोयी-सुविधा देण्याची तयारी केंद्र सरकारने ठेवली आहे. त्यामुळे या लोकांनाही आता समाजात समान दर्जा व सन्मान मिळत आहे, ही समाधानकारक बाब आहे, असेही ते म्हणाले. गोवा राज्य दिव्यांग सबलीकरण खाते व दिव्यांग विकास आयोग यांच्यामार्फत साखळी मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींना विविध उपकरणे वितरित करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी या खात्याच्या संचालिका वर्षा नाईक, आयोगाचे प्रमुख गुरूप्रसाद पावसकर व इतरांची उपस्थिती होती.
सरकारकडून ३ हजार दिव्यांगांना मोफत उपकरणे
गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्तच्या निमित्ताने देशभरात दिव्यांग लोकांना मोठा सन्मान प्राप्त झालेला आहे. सरकारच्या दिव्यांशू या केंद्रामार्फत आतापर्यंत ३ हजार दिव्यांगांना मोफत विविध उपकरणे वितरित करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दहा दिवसांत सुमारे तेराशे लोकांना आवश्यक असलेली उपकरणे वितरित केली आहेत. बांबोळी येथील दिव्यांशू केंद्रात विशेष पाठीच्या कण्याच्या आजारावर सरकारतर्फे मोफत उपचार करण्यात येत आहे. त्याचाही लाभ अनेकजण घेत असून या आजारांशी संबंधित लोकांनीही या केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन गुरुप्रसाद पावसकर यांनी यावेळी केले.