गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 08:30 IST2025-12-08T08:29:37+5:302025-12-08T08:30:17+5:30
जेव्हा आग लागली तेव्हा विनोद कुमार यांनी पत्नी भावनाला मुख्य दरवाजाच्या दिशेने ढकलले. धूरामुळे श्वास गुदमरत होता, आगीमुळे डोळे चणचणत होते त्यातून ती कशीबशी बाहेर आली आणि बेशुद्ध पडली

गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
म्हापसा - गोव्यातील प्रसिद्ध नाइटक्लब बर्च बाय रोमियो लेनला लागलेल्या भीषण आगीत एक आनंदी कुटुंब अवघ्या १५ मिनिटांत उद्ध्वस्त झालं. गाजियाबाद आणि दिल्लीहून सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबातील एकमेव व्यक्ती भावना जोशी दुर्घटनेतून बचावली परंतु तिने तिचा संसार गमावला.
शनिवारी रात्री भावना पती विनोद कुमार आणि ३ बहिणी अनिता, सरोज, कमलासोबत नाइटक्लबमध्ये गेली होती. ही गोव्याची ट्रीप त्यांच्या कुटुंबासाठी आनंदाची आणि उत्साहाने भरलेली होती. हे कुटुंब बागा येथे एका हॉटेलमध्ये राहिले होते. संध्याकाळी फिरण्यासाठी ते चौघे नाइट क्लबला गेले परंतु क्लबमध्ये पाऊल ठेवल्यानंतर काही क्षणांनी तिथे आग लागली. आगीमुळे क्लबमध्ये गोंधळ उडाला. सगळीकडे पळापळ सुरू झाली. आग वेगाने पसरली तसेच धूरही अधिक वाढला.
माहितीनुसार, जेव्हा आग लागली तेव्हा विनोद कुमार यांनी पत्नी भावनाला मुख्य दरवाजाच्या दिशेने ढकलले. धूरामुळे श्वास गुदमरत होता, आगीमुळे डोळे चणचणत होते त्यातून ती कशीबशी बाहेर आली आणि बेशुद्ध पडली. परंतु विनोद कुमार यांनी क्लबमध्ये अडकलेल्या ३ मेहुण्यांना वाचवण्यासाठी पुन्हा क्लबमध्ये एन्ट्री घेतली. आगीच्या विळख्यात विनोद कुमार यांनी आतमध्ये जात तिघींचा शोध घेतला परंतु नशिबाने त्यांना दुसरी संधी दिली नाही. या आगीत विनोद कुमारसह भावना यांच्या तिन्ही बहिणी मृत्यूमुखी पडल्या. आगीतून सुरक्षित बाहेर पडलेल्या भावनाला काहीच कळत नव्हते. ती वारंवार पतीला फोन करत होती. मात्र त्याचवेळी विनोदचा मृतदेह बाहेर आणण्यात आला, त्याचा मोबाईल त्याच्यात हातात होता ज्यावर भावनाचा शेवटचा कॉल दाखवत होता. या क्षणाने भावनाच्या आयुष्यात दु:खाचा डोंगर कोसळला.
ज्या सुट्टीची सुरुवात आनंदाने, हसण्या-खेळण्याने सुरू झाली होती त्याच अखेर एका जळालेल्या क्लबच्या राखेत झाला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी भावना यांना सावरण्याचा प्रयत्न केला परंतु आता ती एकटी पडली होती. तिचा पती, तिच्या तिन्ही बहिणी हे सर्व तिला सोडून गेले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच भावना यांचे नातेवाईक तातडीने गोव्याला रवाना झाले. घरातील सर्व कुटुंबातील मुलांची प्रतिक्षा करत होते मात्र आता ते या जगात नाहीत यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. भावना हिच्यासाठी ही गोवा ट्रीप एक वेदनादायी कटू आठवण बनून राहिली आहे. ती तिच्या अशा पतीमुळे जिवंत आहे ज्याने दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वत:ला आगीत झोकले. ही आग केवळ एक दुर्घटना बनून राहिली नाही तर त्या १५ मिनिटांत भावना यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारी ठरली.