राज्यात 'वंदे भारत'; पेडणे ते काणकोण रेल्वेसेवेला लवकरच सुरुवात होणार: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 13:31 IST2025-02-05T13:31:04+5:302025-02-05T13:31:57+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे गोव्याला मोठा फायदा होणार आहे.

राज्यात 'वंदे भारत'; पेडणे ते काणकोण रेल्वेसेवेला लवकरच सुरुवात होणार: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पेडणे ते काणकोण रेल्वे स्थानकादरम्यान 'वंदे भारत' ही रेल्वे सेवा सुरू केली जाईल. त्यानंतर या सेवेचा विस्तार अन्य रेल्वे स्थानकांवरही करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथे विधानसभा संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार आंतोनियो वास उपस्थित होते.
काणकोण ते पेडणे रेल्वे स्थानकादरम्यान ही रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची चांगली सोय होईल. पण, रस्त्यावरील वाहतुकीचा ताणसुद्धा कमी होणार आहे. उत्तर व दक्षिण गोव्याला जोडण्यासाठी या सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. पेडणे ते काणकोणनंतर या रेल्वे सेवेचा विस्तार केला जाणार आहे. येत्या २ ते ३ वर्षांत गोव्यात ही रेल्वेसेवा सुरू होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे गोव्याला मोठा फायदा होणार आहे. यात विशेष करून वेलनेस टुरिझम, हेरिटेज टुरिझम, पायाभूत सुविधांचा विकास आदी क्षेत्रांना लाभ होईल. सबका साथ, सबका विकास हे ब्रीदवाक्य पुढे नेऊन या अर्थसंकल्पात भर दिला आहे. गोव्याला कोकण रेल्वे व दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कामांसाठी या अर्थसंकल्पात ४८२ कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.
आयआयटीची पायाभरणी
गोव्यात आयआयटीसाठी कायमस्वरुपी कॅम्पस उभारला जाणार आहे. त्यासाठी जागा लवकरच निश्चित करून या प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल. आयआयटी प्रकल्पासाठी स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
एनजीओंसाठी अतिरिक्त निधी दिला जाणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम चालवणाऱ्या एनजीओ तसेच सामाजिक संस्थांना समाज कल्याण योजनेंतर्गत आता राज्य सरकार आता प्रती महिना २ लाख रुपयांचा विशेष निधी देणार आहे. या निधीमुळे त्यांना त्यांचे काम सुरळीतपणे करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मडगावहून तीन रेल्वे सुटणार
महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी गोव्यातून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. राज्यातील भाविकांसाठी ६ फेब्रुवारीपासून ही मोफत रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेंतर्गत तीन रेल्वे सोडण्यात येणार आहेत. यामध्ये मडगावहून ६ रोजी सकाळी ८ वाजता रेल्वे निघेल. त्यानंतर दि. १३ व २१ रोजी रेल्वे सोडल्या जातील.
अर्थसंकल्पातून काय?
कर्ज मर्यादेत वाढ केल्याने गोव्यातील १७ हजार ५०० शेतकऱ्यांना लाभ एमएसएमईची क्रेडिट मर्यादा ५ कोटींहून १० कोटी आरोग्यक्षेत्राला प्रोत्साहन. गोमेकॉतील मेडिकल सीटसमध्ये वाढ. स्टार्टअप क्रेडित मर्यादेत वाढ केल्याने आदिवासी महिला उद्योजकांना लाभ