अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका; कापणीच्या प्रतीक्षेत असलेली भातशेती झाली आडवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:44 IST2025-10-23T09:44:31+5:302025-10-23T09:44:31+5:30
भात गळून पडणे, कोंब येण्याची भीती

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका; कापणीच्या प्रतीक्षेत असलेली भातशेती झाली आडवी
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: दिवाळीनंतर मागील तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसातून बार्देश तालुक्यातील बऱ्याच भागात पिकलेली भातशेती आडवी झाली. पडणाऱ्या पावसाने उसंती न घेतल्यास तसेच त्याची वेळेवर कापणी न झाल्यास भातपीकाला पुन्हा कोंब येण्याची किंवा कुजण्याची भिती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
बार्देश भागात पिकलेल्या भात पिकाची कापणी करण्याचे काम बऱ्याच भागातून सुरू आहे. अवकाळी पावसामुळे भातकापणीला अडथळे निर्माण झाले आहेत. कापणीच्या प्रतिक्षेत असलेली उभे पीक आडवे झाले आहेत. काही शेती मात्र भाताची कापणी करणाऱ्या मशीनच्या प्रतिक्षेत आडवी झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली. सुकूर, गिरी, हळदोणा, बस्तोडा, मयडे, उसकई, थिती, सांगोल्डा, कालवी, पोंबुर्का परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे.
पुढील काही दिवसात भातपिकाची कापणी व्हावी आणि पिकलेले भात सुरक्षीत रहावे यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. अवकाळी पाऊस न थांबल्यास शेतकऱ्याचे अजुन नुकसान होणार आहे.
मजुरांची कमतरता
बार्देश तालुक्यातील भातशेतीच्या काही भागात पाणी साचल्याने कापणीसाठी आणलेल्या मशीनला अडथळा निर्माण झाला आहे. पयार्य म्हणून कामगारांद्वारे भातकापणी करावयाची झाल्यास कामगारांची कमतरता भासून येत आहे. त्यामुळे भातकापणी कशी करणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
शेतकऱ्यावर दुहेरी संकट
तालुक्यात दुपारनंतर पाऊस येत असल्यामुळे कापणी करणे शक्य होत नाही. कापणीयोग्य झालेले भातपीक शेतात उभे राहिले तरी देखील गळून पडण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस कोसळल्यानंतरही नुकसान होण्याची भिती असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
भात कापणीसाठी ३२ मशीन्स उपलब्ध
कृषी विभागीय कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शेती आडवी झाली असली तरी ती खराब झाल्याची किंवा अंकुरल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या नाहीत. शेती खराब होऊ नये त्यांची वेळीच कापणी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. बार्देश तालुक्यात कापणीसाठी सेवा पुरवणाऱ्यांकडून ३२ मशीन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु पाऊस संध्याकाळी लवकर हजेरी लावत असल्याने कापणीचे काम निर्धारीत वेळेपूर्वी आटोपते घेणे भाग पडत आहे.
हमलात पावसामुळे शेतकऱ्यांची धावाधाव
दीपावली दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाविक तसेच शेतकऱ्यांची बरीच धावाधाव झाली. भातपीक तसेच आकाशकंदील भिजल्याने नुकसान सोसावे लागल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कापणीयोग्य झालेल्या पिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट निराशा दिसून आली.
गेले कित्येक दिवस शेतकरी भात कापणीच्या कामात व्यस्त होते. कित्येकांनी शेत पिकाची मचाण करून ठेवले होते तर काहींनी भात कापून जमिनीवर ठेवले होते. दुसऱ्या दिवशी कापून ठेवलेले भात गोळा करणार होते, मात्र रात्री नऊच्या सुमारास पावसाने हजेरी लावली व शेतकऱ्याची धांदल उडाली. पाण्यात पीक राहिल्याने नुकसान सोसावे लागल्याचे शेतकरी बाप्पा शेठकर यांनी सांगितले.
मुलांची निराशा
अचानक पावसामुळे घराच्या छप्परावर लावलेले आकाशकंदील पावसात भिजले. अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. नवीन आकाशकंदील घेणे शक्य झाले नसल्यामुळे संपूर्ण रात्र आकाशकंदील अभावी गेली. अवकाळी पावसामुळे मात्र मुलांच्या कला कौशल्याची निराशा झाली असे पालक हेमचंद्र नाईक यांनी सांगितले.