सासष्टी तालुक्यात दोन अपघातात दोघेजण ठार
By सूरज.नाईकपवार | Updated: December 17, 2023 16:36 IST2023-12-17T16:36:01+5:302023-12-17T16:36:17+5:30
सासष्टी तालुक्यात शनिवारी मध्यरात्री दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

सासष्टी तालुक्यात दोन अपघातात दोघेजण ठार
मडगाव : सासष्टी तालुक्यात शनिवारी मध्यरात्री दोन ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. लोटलीतील आग्नेल प्राथमिक हायस्कूलजवळ झालेल्या स्वयं अपघातात नागराज पद्मसिंग वाडी (४५, रा. आंबेकुळे-फोंडा) हे ठार झाले. तर नुवे येथे कारच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जुआंव बाप्तिस्ता आंतोनियो कुतिन्हो (६८, रा. डोंगरी माजोर्डा) असे त्यांचे नाव आहे.
मायणा-कुडतरी पोलिसांनी सांगितले की, बुलेटवरुन जाताना झालेल्या स्वयंम अपघातात नागराज पदमसिंग वाडी (४५) ठार झाले. लोटलीतील आग्नेल प्राथमिक हायस्कूलजवळ मध्यरात्री १.१५ च्या सुमारास हा अपघात घडला. नागराज हे आंबेकुळी-फोंडा येथे राहात होते. या अपघातात बुलेटच्या मागच्या सीटवर बसलेला सादीक मोहमद्द अहिम (२२) हाही गंभीर जखमी झाला आहे. दोघेही मडगावहून फोंड्याच्या दिशेने जात होते, अशी माहिती मायणा-कुडतरी पोलिसांनी दिली. अपघाती मृत्यू म्हणून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे.
दरम्यान, नुवे येथे शनिवारी रात्री झालेल्या अपघातात जुआंव बाप्तिस्ता आंतोनियो कुतिन्हो जखमी झाले होते. रात्री पावणेआठच्या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली होती. यात गंभीर जखमी कुतिन्हो यांना उपचारासाठी तातडीने गोमेकॉत दाखल केले असता, तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.