तुयेच्या इस्पितळाचे लोकार्पण, लवकरच मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज उभारणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:04 IST2026-02-03T10:03:41+5:302026-02-03T10:04:28+5:30
मंत्री विश्वजीत यांनी तर आम्ही दोघेही भाजपचे नेते संघटीत व एक आहोत, असे नमूद करत आमदार जीत आरोलकर यांनाही आश्चर्यचकित केले.

तुयेच्या इस्पितळाचे लोकार्पण, लवकरच मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज उभारणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यात तुये येथील इस्पितळाबाबत नेमके कोणते नाट्य घडतेय याकडे पेडणेच्या लोकांचे लक्ष होते. पण या दोन्ही नेत्यांनी काल, सोमवारी तुये येथे शेकडो लोकांसमोर युती व मनोमिलनाचे दर्शन घडविले. दोन्ही नेत्यांनी हातात हात घेऊन आम्ही दोघेही एक आहोत व गोव्याच्या विकासासाठी काम करतोय असे जाहीर केले. मंत्री विश्वजीत यांनी तर आम्ही दोघेही भाजपचे नेते संघटीत व एक आहोत, असे नमूद करत आमदार जीत आरोलकर यांनाही आश्चर्यचकित केले.
तुये येथील इस्पितळाचे, सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर, माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण ऊर्फ नानू हरमलकर, तुये सरपंच अमिता
साळगावकर यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते. आज तुये येथील इस्पितळ पेडणेवासीयांना आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे.
येत्या सहा महिन्यांत येथे ऑपरेशन थिएटर सुरू होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे अभिनंदन केले. राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तुये येथील सरकारी इस्पितळाचा लोकार्पण सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. आता याच इस्पितळात लवकरच गोवा मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
या इस्पितळामुळे उत्तर गोव्यातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असून, पेडणेवासीयांसाठी हे इस्पितळ एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. तुये येथील सामुदायिक आरोग्य केंद्राशी आपला जवळचा संबंध असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, २००७-०८ या कालावधीत आपण या आरोग्य केंद्रात डॉक्टर म्हणून काम करत असताना जनतेला आरोग्य सेवा दिली होती. आज याच इस्पितळाचे लिंक हॉस्पिटल म्हणून उद्घाटन करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, म्हापसा येथील जिल्हा इस्पितळापेक्षाही तुये येथील इस्पितळ मोठे आहे. माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हे इस्पितळ उभारले आणि आज आमदार जीत आरोलकर यांच्या पाठपुराव्यामुळे ते कार्यान्वित झाले असल्याचे राणे म्हणाले. या इस्पितळात काही दिवसांसाठी नोडल ऑफिसर म्हणून डॉ. राजेश पाटील यांची नियुक्ती केल्याचेही त्यांनी सांगितले.
पेडणेवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भाजप सरकारच्या काळात, मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना या इस्पितळाची पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर भाजपचेच मुख्यमंत्री असताना प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी एक पाऊल पुढे टाकत इमारत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. आज भाजप सरकारनेच या इस्पितळाचे लोकार्पण केले असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धारगळ येथील आयुष इस्पितळाचाही उल्लेख केला.
पुन्हा भाजपला सत्तेत आणू : राणे
डॉ. प्रमोद सावंत राजकारणात येण्यापूर्वी सरकारी आरोग्य सेवेत कार्यरत होते. विशेष म्हणजे त्यांनी ज्यावेळी डॉक्टरकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते तुये आरोग्य केंद्रात होते. त्यावेळी मी आरोग्यमंत्री होतो आणि त्यांचा डॉक्टरकीचा राजीनामा माझ्याच टेबलावर आला होता, तो राजीनामा मीच स्वीकारला होता, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. त्याचवेळी राणेंनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांना राजकारणात आणण्यासाठी आपलाही थोडा वाटा असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, आज मी आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत संघटित असून पुन्हा भाजपला सत्तेवर आणू, असे मंत्री राणे यावेळी म्हणाले.
पेडणे, तुये आणि पार्से येथील भगवती देवींच्या आशीर्वादामुळे आणि पेडणे तालुक्यातील जनतेच्या सहकार्यामुळे हे इस्पितळ आज कार्यान्वित होत आहे. मुख्यमंत्री व मंत्री राणेंनी आपला शब्द पाळला. - जीत आरोलकर, आमदार
पेडणेवासीयांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी यासाठी केलेले प्रयत्न आज फळाला आले आहेत. इस्पितळासाठी येथील जनतेने जे आंदोलन केले, मशाल मिरवणूक काढली, त्या सर्वांचे या इस्पितळाच्या उभारणीत योगदान असल्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. - प्रवीण आर्लेकर, आमदार