जुवारीवरील टॉवर गॅलरी जागतिक आकर्षण ठरणार; नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकल्पाची पायाभरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:49 IST2025-05-24T12:49:03+5:302025-05-24T12:49:22+5:30
या प्रकल्पामुळे ५०० हून अधिक स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

जुवारीवरील टॉवर गॅलरी जागतिक आकर्षण ठरणार; नितीन गडकरी यांच्याहस्ते प्रकल्पाची पायाभरणी
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : जुवारी पुलावर २७० कोटी खर्चुन बांधण्यात येणारा टेहळणी मनोरा आणि निरीक्षण गॅलरी (टॉवर) प्रकल्प संपूर्ण भारतातच नव्हे तर पर्यटनाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर प्रसिद्ध प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ५०० हून अधिक स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
चिखली पंचायत सभागृहात शुक्रवारी नवीन जुवारी पुलावरील प्रकल्पाची पायाभरणी मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री सुदिन ढवळीकर, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार कृष्णा साळकर, आमदार अँथनी वास, आमदार वीरेश बोरकर, आमदार आलेक्स रेजीनाल्ड, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, चिखलीच्या उपसरपंच एश्वर्या कोरगावकर उपस्थित होत्या.
मंत्री गडकरी यांनी पॅरीसमधील आयफेल टॉवर जसा जगभरात प्रसिद्ध आहे तसाच नवीन जुवारी पुलावर बांधण्यात येणारा टॉवर जगप्रसिद्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशभरातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हा प्रकल्प पाहण्यासाठी गोव्यात येतील. जुवारी पुलावरील हा प्रकल्प भारतातील हा पहिलाच असून दुसरा प्रकल्प प्रयागराज-उत्तरप्रदेश येथे बांधण्याचा विचार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. प्रकल्पातून पर्यटकांना संपूर्ण गोव्याचे, समुद्राचे दर्शन होणार आहे. या प्रकल्पासाठी खर्च होणाऱ्या रक्कमेतील ४९ टक्के रक्कम रोजगार निर्मीतीसाठी खर्च करणार असल्याचे गडकरी म्हणाले.
मुंबई ते गोवा चौपदरी महामार्गाचे पुढच्या ३ ते ४ महिन्यांत ते काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर गोव्याहून मुंबईला या मार्गावरून जाण्याचा प्रवास ६ ते ७ तासांचा होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. कुंकळ्ळी ते बाणावली चौपदरी प्रकल्प लवकरच साकारण्यात येणार आहे. त्यासाठी १२०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. १ हजार कोटी खर्चुन मोले ते खांडेपार पर्यंतचा २१ किलोमीटरचा चौपदरी महामार्ग होणार आहे. - १२०० कोटी खर्च करून बोरी पुलाच्या कामाची सुरवात होईल. टॉवर प्रकल्पात गोव्याची संस्कृती, इतिहास दर्शविण्याचा मनोदय आहे. त्यामुळे राज्य सरकारने गोमंतकीय वास्तुविशारद यांची स्पर्धा घेऊन त्यांना प्रकल्पाचे डिझाईन काढण्यास सांगावे, असेही गडकरी म्हणाले.
टॉवर प्रकल्पात गोव्याची संस्कृती, इतिहास दर्शविणार
टॉवर प्रकल्पात गोव्याची संस्कृती, इतिहास व गोव्याच्या विविध गोष्टी दर्शविण्याचा मनोदय आहे. त्यामुळे राज्य सरकारने गोमंतकीय वास्तुविशारद यांची स्पर्धा घेऊन त्यांना या प्रकल्पाचे डीझाईन काढण्यास सांगावे. या स्पर्धेसाठी सरकारने बक्षीस म्हणून मोठी रक्कमही ठेवावी. आपले नाव व्हावे यासाठी स्पर्धेत मोठ्या प्रमाणात गोव्यातील वास्तुविशारद भाग घेतील. त्यामुळे आम्हाला योग्यरित्या गोवा दर्शविणाऱ्या प्रकल्पाचे 'डीझाईन' मिळेल, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
रोगाराची नवी संधी
आजचा दिवस गोमंतकीयांसाठी आनंदाचा असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. गेल्या ११ वर्षात केंद्राच्या सहाय्याने गोव्यात ३३ हजार कोटी खर्चुन अनेक प्रकल्प मार्गी लागले. आता जुवारीवरील नवीन प्रकल्पातून पाचशेहून अधिक रोजगार मिळणार आहेच. शिवाय गोव्याला मोठा आर्थिक लाभही होईल. पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून पर्यटक क्षेत्रासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. तसेच आपण मंत्री गडकरी यांच्याकडे 'वॉटर टॅक्सी' प्रकल्प सुरू करण्याबाबत विचार मांडल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.