ऋषीच्या शरीरात सापडले तीन प्रकारचे ड्रग्स: पोलिस अधीक्षक वर्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:34 IST2025-09-12T11:32:44+5:302025-09-12T11:34:34+5:30
ड्रग्स पुरविणाऱ्यांचा शोध सुरू

ऋषीच्या शरीरात सापडले तीन प्रकारचे ड्रग्स: पोलिस अधीक्षक वर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : बिट्स पिलानी संस्थेतील मृत विद्यार्थी ऋषी नायर याच्या शरीरात सापडलेले तीन प्रकारचे अमली पदार्थ कोठून आले याचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती दक्षिण गोवापोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली. गुरुवारी गोमेकॉत ऋषीच्या रक्ताची आणि पोटातील स्त्रावाच्या नमुन्यांची रेंडोक्स यंत्रणेतून वैद्यकीय चाचणी करण्यात आली. चाचणीत त्याच्या शरीरात 'मेथाफेटामाइन, एमडीएमए आणि एमपीएच' हे तीन अमली पदार्थ सापडले.
पोलिस अधीक्षक वर्मा यांनी ही माहिती दिली. 'बिट्स पिलानी 'मध्ये ये -जा करणाऱ्यांची व सर्व गोष्टींची तपासणी केली जात आहे. वैद्यकीय अहवालाबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक वर्मा म्हणाले की, ऋषी महिन्याभरापूर्वी हैदराबाद येथून गोव्यात आला होता. आता सापडलेले तिन्ही अमली पदार्थ त्याने हैदराबाद येथून आणले का? जर त्याच्याकडे हे अमली पदार्थ होते, तर मग ते शिक्षण संस्थेच्या गेटवर सापडले कसे नाहीत? ऋषीला हे अमली पदार्थ कोण पुरवत होते असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आम्ही सर्व शक्यता पडताळत आहोत. बिट्स पिलानीमध्ये एक पोलिसांचे पथक तपास करत आहे. तेथे ये-जा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची आकस्मिक तपासणीही केली जात आहे. डॉ. घोडकिरेकर म्हणाले, ऋषी याच्या रक्तात 'झोल्पफिदेम' १४.०३ मी. ली. आणि पोटातील स्त्रावाच्या नमुन्यात 'एमफेटामाइन' ४२१ मी. ली., 'एमडीएमए' ११०.१९ मी.ली. आणि 'एसीई' ३०.६४ मी. ली. सापडले.
मेथाफेटामाइन, एमडीएमए आणि एमपीएच हे अमली पदार्थ आहेत. ते नशा करण्यासाठी वापरले जातात. हे अमली पदार्थ एकत्र चेतल्यामुळेच 'गॅस्ट्रिक रिअॅक्शन' होऊन ऋषीला झोपेतच उलटी झाली. नंतर ती उलटी श्वासनलिकेत जाऊन गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा.
काय सांगतो ऋषीचा अहवाल?
आठ दिवसांपूर्वी ऋषी नायर या २० वर्षीय युवकाचा झोपेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. काल गोमेकॉत 'रेंडोक्स' पद्धतीने ऋषीच्या उलटीची वैद्यकीय चाचणी केल्यावर त्यात तीन प्रकारचे अमली पदार्थ आढळले. अमली पदार्थ सेवनामुळेच झोपेत ऋषीला उलटी झाली. नंतर त्यातच त्याचा गुदमरून मृत्यू झाला' असे गोमेकॉचे शवविच्छेदन तज्ज्ञ डॉ. मधु घोडकिरेकर यांनी सांगितले.
काय आहे 'रेंडोक्स' वैद्यकीय चाचणी?
रेंडोक्स या यूकेमधील प्रगत कंपनी असून त्यांच्याकडे नवीन वैद्यकीय चाचणीच्या यंत्रणा आणि तंत्रज्ञान वापरले जाते. गोमेकॉत ही यंत्रणा २०१४ मध्ये पहिल्यांदा आणली गेली. २०२४ पासून मल्टिस्टेंट रेंडोक्स यंत्रणा वापरून यामधून सुमारे २९ प्रकारचे अमली पदार्थ कोणत्याही व्यक्तीचे रक्त आणि इतर स्रावांच्या चाचण्यांतून ओळखले जाऊ शकतात. ही यंत्रणा ऋषीच्या चाचणीसाठी वापरण्यात आली.