चतुर्थीपूर्वीच तिघांना पक्का निवारा; साखळी भाजपचा उपक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 09:06 IST2025-08-25T09:05:21+5:302025-08-25T09:06:02+5:30

मुख्यमंत्री 'माझे घर योजना' महत्त्वाकांक्षी तसेच कल्याणकारी ठरेल

three people get permanent shelter before ganesh chaturthi in goa | चतुर्थीपूर्वीच तिघांना पक्का निवारा; साखळी भाजपचा उपक्रम 

चतुर्थीपूर्वीच तिघांना पक्का निवारा; साखळी भाजपचा उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : 'भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी व प्रत्येक घरात समृद्धीसाठी सातत्याने कार्यरत असणारा एक सामाजिक दुवा आहे. त्याच भावनेने साखळी मतदारसंघातील भाजप मंडळ समिती व कार्यकर्त्याच्या सहभागातून मतदारसंघातील तीन कुटुंबांना पक्के घर बांधून निवारा देण्याची संधी प्राप्त झाली. याचबरोबर माझे घर योजना खऱ्या अर्थाने कल्याणकारी ठरेल. अशा योजनांतून जनतेपर्यंत सुविधा पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी तसेच हरवळे परिसरात गेल्या पावसाळ्यात तीन घरांचे मोठे नुकसान झाले. त्यांचा निवारा हरवला होता. भाजपच्या साखळी मतदारसंघातील मंडळ समिती व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने या तिन्ही घरांची बांधणी करण्यात आली. या तिन्ही घरांचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी चतुर्थीपूर्वी लोकांना घरे मिळाली ही खूप चांगली बाब असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

यावेळी मंडळ अध्यक्ष रामा नाईक, सरपंच गौरवी नाईक, साईमा गावडे, सिद्धी प्रभू, आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, सुभाष फोंडेकर यांसह इतर पंचायत सदस्य, नगरसेवक व भाजप मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'गणेश चतुर्थी हा आनंदाचा सण. हा सण जनतेला तणावमुक्त आरोग्य व आनंद देणारा ठरावा यासाठी सरकारने गेल्या काही महिन्यांत घेतलेले निर्णय, मंजूर केलेली विधेयके कल्याणकारी ठरतील.

मालकीहक्क देण्याचे भाग्य

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'सरकारने माझे घर योजना आखून प्रत्येक कुटुंबाला दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे लोकांचा मानसिक ताण कमी झाला. त्यांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम जाणवेल. १९७२ पूर्वीची घरे कायम करून त्यांना पूर्णपणे मालकीहक्क देण्याचे भाग्य मला लाभले. त्या कुटुंबांचा ताणही कमी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाची शिखरे सर करत आहे. राज्यातील प्रत्येक घरात समृद्धी व शेवटच्या घटकापर्यंत विकासाची दारे खुले करणे हे स्वप्न साकारण्यात आम्ही यशस्वी होत असल्याचे समाधान आहे'


 

Web Title: three people get permanent shelter before ganesh chaturthi in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.