घरांना विरोध करणाऱ्यांना जाब विचारावा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:50 IST2025-12-12T12:49:55+5:302025-12-12T12:50:59+5:30
कुर्टीतील मगो - भाजपचे उमेदवार प्रीतेश गावकर यांची प्रचार सभा, ढवळीकरांची उपस्थिती.

घरांना विरोध करणाऱ्यांना जाब विचारावा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : प्रत्येक गोमंतकीयांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून आम्ही योजना आणल्या. एक पाऊल पुढे जाताना सर्व घरांना कायदेशीर अभय देण्यासाठी 'माझे घर' योजना आणली. २०२७ ची विधानसभा निवडणूक येण्यापूर्वी प्रत्येकाकडे हक्काचे घर असेल. या योजनेला सरसकट सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला. आता जिल्हा पंचायत निवडणुकीच्यावेळी ते मते मागायला येतील त्यावेळी त्यांना या विषयावरून जाब विचारा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदारांना केले.
कुर्टी जिल्हा पंचायत मतदारसंघातील मगो भाजपचे उमेदवार प्रीतेश गावकर यांच्या प्रचार सभेवेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर, माजी सभापती विश्वास सतरकर, कुर्टीचे सरपंच नावेद तहसीलदार, नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, मतदारसंघाचे प्रभारी प्रशांत देसाई, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, रॉय नाईक, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला उमेदवार प्रीतेश गावकर यांनी स्वागत केले. नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी आभार मानले.
गोव्याचा सर्वांगीण विकास हा मागील दहा वर्षातच झाला आहे. हवे तर मागील ६४ वर्षांचा इतिहास काढून पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पस्तीस हजार कोटी रुपयांचा निधी गोव्याच्या विकासासाठी प्रत्यक्षात दिला आहे. अप्रत्यक्ष निधीचा आकडा तर याहून अधिक आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच गोव्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारले आहे.
गोव्यातील रस्ते चौपदरी करण्याचे श्रेय मंत्री नितीन गडकरी यांना जाते. आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा किल्ला उभा राहणार आहे. हरवळे येथील रुद्रेश्वराच्या देवळाचा कायापालट होईल.
पुढील २५ वर्षांचे स्वप्न डोळ्यात ठेवून आम्ही विकास श्रृंखला राबवत आहोत. विकास साधत असतानाच इथल्या सामान्य माणसाचा कसा विकास होईल हेसुद्धा आम्ही पाहत आहोत. म्हणूनच लोकांच्या उद्धारार्थ अनेक योजना आम्ही मार्गी लावल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्याची संस्कृती शाबूत ठेवण्यासाठीच युती
मगो भाजप युतीच्या सरकारवर लोकांचे प्रेम आहे, याची जाणीव आम्हाला प्रचारावेळी येत आहे. सध्याचा मगो-भाजप युतीचा प्रचार हा फक्त जिल्हा पंचायत निवडणुकीपुरती मर्यादित नसून फोंडा पोटनिवडणुकीचा प्रचारसुद्धा आम्ही या माध्यमातून सुरू ठेवला आहे. गोव्याची संस्कृती व पर्यायाने गोवा शाबूत ठेवण्यासाठीच ही युती आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा पंचायत प्रणाली उपयुक्त ठरत आहे. ज्या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा निधी वापरता येत नाही, तिथे जिल्हा पंचायतींच्या माध्यमातून आम्ही विकासकामे राबवत आहोत. दोन्ही जिल्हा पंचायती भाजपकडे आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. जेणेकरून ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून आम्हाला केंद्राकडूनसुद्धा भरघोस निधी आणता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
युतीच्या उमेदवाराला निवडून द्या : ढवळीकर
मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही युतीचा धर्म पाळत आहोत. मगोच्या प्रत्येक कार्यकर्त्याने युतीच्या उमेदवारासाठी प्रयत्न करायला हवेत. फक्त फोंडा तालुकाच नव्हे तर गोव्यात जिथे युतीचे उमेदवार आहेत तिथे सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करूया. युती टिकली तरच गोव्याची संस्कृती टिकेल. म्हणूनच पोटनिवडणुकीतही युतीच्या उमेदवाराला निवडून आणूया. जिल्हा पंचायत निवडणुकीतसुद्धा मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत. माजी नगरसेवक सुनील देसाई यांनी यावेळी विचार व्यक्त केले.