११५ गावांचा तिसरा कुशावती जिल्हा; अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:03 IST2026-01-01T08:02:04+5:302026-01-01T08:03:55+5:30
वारसा, संस्कृती, पर्यावरणासह कुशावती परंपरेचे प्रतीक बनण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास

११५ गावांचा तिसरा कुशावती जिल्हा; अधिसूचना जारी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील तिसरा जिल्हा अधिसूचित करण्यात आला असून त्याचे नाव 'कुशावती' असे निश्चित केले आहे. कुशावती नदी ही वारसा, संस्कृती, पर्यावरण तसेच परंपरेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या जिल्ह्यात चार तालुक्यांतील ११५ गावांचा समावेश असेल.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'तिसऱ्या जिल्ह्यात सांगे, केपे, काणकोण व धारबांदोडा या चार तालुक्यांचा समावेश असेल. सरकारने हा जिल्हा अधिसूचित केला आहे. तिसरा जिल्हा म्हणजे तिसरी जिल्हा पंचायत होणे. ती झाली की तिसरा जिल्हा पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्षदेखील लवकरच होतील, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, 'नव्या जिल्ह्याला कुशावती असे नाव देण्यात आले आहे. कुशावती नदीचा भौगोलिक वारसा, संस्कृती, पर्यावरण तसेच उच्च परंपरेचे महत्त्व या जिल्ह्याला आहे. या सर्वांचे ते एक प्रतीक आहे. गोव्यात चालुक्य राजाचे राज्य असताना कुशावती नदीवरून गोव्याने विकासाच्या दृष्टीने झपाट्याने पावले टाकली होती. कुशावती नदीचे भौगोलिक, सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. नदीच्या काठावर रॉक कार्डिंग असून ते पाहण्यासाठी पर्यटकांसह अनेक लोक तेथे येतात.'
या जिल्ह्यातील सर्व जिल्हा पंचायत सदस्यांना कुशावती या नव्या जिल्ह्यासाठी अभिनंदन. लवकरच त्यांची जिल्हा पंचायत असेल. तोपर्यंत दक्षिण गोव्यातून जिल्हा कार्यरत असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्राकडून १५ कोटी अतिरिक्त निधी
मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे सांगितले की, प्रस्तावित कुशावती जिल्ह्याला 'आकांक्षी जिल्हा' म्हणून घोषित करण्यात येणार आहे. देशभरात सध्या सुमारे १२० आकांक्षी जिल्हे असून, या जिल्ह्यांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी सुमारे १५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. हा निधी प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकासासाठी वापरण्यात येतो. कुशावती जिल्ह्याच्या विकासासाठीही केंद्र सरकारकडे अतिरिक्त विशेष निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. नव्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल आणि दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सुविधा जवळ मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येथे आज नानोडा चव्हाटेश्वराचा वर्धापनदिन
साळ नानोडातील सातेरी केळबाई पुरमार देवस्थान अंतर्गत चव्हाटेश्वराचा सातवा वर्धापनदिन आज, गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा होईल. यानंतर आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ४ वा. भजन, सायंकाळी ७.३० वा. जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ दांडेली, आरोस-सावंतवाडी प्रस्तुत दशावतारी नाट्यप्रयोग 'शिव मंगळागौरी' सादर होईल. सर्व भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सातेरी केळबाई पुरमार देवस्थान -नानोडातर्फे कळविण्यात आले आहे.
कुशावती हा वारसा
कुशावती नदी ही सांगे, केपे, काणकोण व धारबांदोडा या चार तालुक्यांतून वाहते. दक्षिण गोव्यातील या तालुक्यांतील लोकांच्या मनात कुशावतीचे अढळ स्थान आहे. हा जिल्हा वारसा, संस्कृती व पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. पर्यावरणाचे तसेच नदीचे जतन करण्यासाठी, भविष्याच्या दृष्टीने जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
काणकोण व धारबांदोडाहून बस सेवा
काणकोण व धारबांदोडा कुशावती जिल्ह्याच्या केंद्रस्थानी केपे असल्याने तालुक्यातील नागरिकांना अंतर जास्त भासेल, अशी टीका होत असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या दोन्ही तालुक्यांतून केपेपर्यंत बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले की, काणकोण आणि केपेत करमलघाट मार्गे विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे काणकोण तालुक्यातील नागरिकांना केपे येथे सहज व जलद पोहोचता येणार आहे. तसेच रस्ते रुंद करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर काणकोण येथून केपे येथे अवघ्या अर्ध्या तासात पोहोचणे शक्य होईल. याशिवाय, धारबांदोडा ते केपे जोडणारा जिल्हा रस्ता विकसित करण्यात येणार असून, त्यासोबतच इतरही विशेष रस्ते प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे नव्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.