तिसरा जिल्हा मान्य, पण केपे मुख्यालय नको; नागरिकांतून तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 09:52 IST2026-01-02T09:51:45+5:302026-01-02T09:52:31+5:30
काणकोणचा मडगावशीच संबंध : सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास आंदोलनाचा इशारा

तिसरा जिल्हा मान्य, पण केपे मुख्यालय नको; नागरिकांतून तीव्र नाराजी
अशोककुमार देसाई, लोकमत न्यूज नेटवर्क, पैंगिणः राज्य सरकारने काणकोण, सांगे, केपे आणि धारबांदोडा या चार तालुक्यांसाठी स्वतंत्र तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल काणकोणमधील नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, या नव्या जिल्ह्याचे मुख्य कार्यालय केपे येथे ठेवण्याचा निर्णय काणकोणवासीयांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचा असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे काणकोणचा समावेश मडगाव येथेच ठेवावा, अशी जोरदार मागणी काणकोणमधील नगरसेवक, पंच-सरपंच आणि जागृत नागरिकांनी केली आहे.
नवीन जिल्हा जरूर व्हावा, मात्र त्यामध्ये काणकोणचा समावेश करू नये, अशी स्पष्ट भूमिका नागरिकांनी मांडली आहे. लोकांच्या भावना विचारात न घेता सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास काणकोणमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा गर्भित इशाराही नागरिकांनी दिला आहे.
शिक्षण, न्यायालयीन कामकाज, रुग्णालये, बाजारपेठ यांसारख्या महत्त्वाच्या गरजांसाठी मडगाव हे काणकोणला अधिक जवळचे आणि सोयीचे केंद्र आहे. मुक्तीपूर्व काळात काणकोण तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने मडगावशी काणकोणच्या लोकांचे नाते दृढ झाले.
अकरावीनंतरच्या शिक्षणासाठी मडगावातील चौगुले महाविद्यालयासह विविध महाविद्यालयांतून काणकोणच्या असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले असून, त्यांनी राजकीय, प्रशासकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. मडगाव नगरपालिका, रवींद्र भवन, कोकणी भाषा मंडळ, विद्यार्थी चळवळ, तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये काणकोणवासीयांचे योगदान आहे.
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पोळे ते मडगाव आणि करमलघाट पार करून अनेक कुटुंबे मडगावमध्ये स्थायिक झाल्याचे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेडमास्टर अनंत अग्नी यांनी व्यक्त केले आहे. सरकारने स्थापन केलेल्या तिसऱ्या कुशावती जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणाबद्दल जनतेतून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
राज्य सरकार काणकोणमधील नागरीक तसेच लोकप्रतिनिधींची मागणी मान्य करणार की मुख्यालय केपे येथेच करणार हे पाहणे आता औत्स्युक्याचे ठरणार आहे.
नव्या जिल्ह्यात काणकोणचा समावेश झाल्यास काणकोणच्या लोकांची मोठी गैरसोय होणार आहे. यापूर्वी वाहतूक खात्याचे कार्यालय केपे येथे असताना काणकोणवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तीच परिस्थिती पुन्हा येऊ नये, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणी काणकोणचे आमदार व कॅबिनेट मंत्री डॉ. रमेश तवडकर, सर्व पंचायत प्रतिनिधी, नगरसेवक, नगराध्यक्ष तसेच दक्षिण गोव्याचे खासदार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
काणकोण दक्षिण गोव्यातच ठेवा
दरम्यान, कुशावती जिल्ह्याच्या स्थापनेचे स्वागत करीत असतानाच सरकारने जनतेला विश्वासात न घेता निर्णय घेतल्याबद्दल विरोधी पक्षांनी खेद व्यक्त केला आहे. गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनी काणकोण तालुक्याचा समावेश तिसऱ्या जिल्ह्यात न करता दक्षिण गोव्यातच ठेवावा किंवा तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय काणकोण येथेच असावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे.
केपे गैरसोयीचे केंद्र
केपे हे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचे केंद्र असून, विविध कामांसाठी तेथे जाण्यासाठी पूर्ण दिवस खर्ची पडणार असल्याने काणकोणवासीयांवर मोठा ताण येणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय पुनर्विचारात घ्यावा, अशी काणकोणकरांची ठाम मागणी आहे.
गोवा मुक्ती लढा, विलीनीकरण वाद, कोकण रेल्वे आंदोलन, कोकणी-मराठी वाद आणि विविध न्याय्य हक्कांसाठी झालेल्या आंदोलनांचा इतिहास सरकारने लक्षात घ्यावा. - शुभम कोमरपंत, नगरसेवक