मगोविषयी 'ते' करतात एप्रिल फूल; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची 'लोकमत'ला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:13 IST2025-04-04T12:12:38+5:302025-04-04T12:13:40+5:30
सुदिन ढवळीकर यांना काल 'लोकमत'ने विचारले असता, कुणी तरी सध्या 'एप्रिल फूल' करतोय, असे सांगून अशा प्रकारची शक्यता फेटाळून लावली.

मगोविषयी 'ते' करतात एप्रिल फूल; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची 'लोकमत'ला माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मगोपचे आमदार तेवढे भाजपमध्ये जातील व पक्ष संघटना मात्र बाहेर राहील अशा प्रकारच्या चर्चेचे पिल्लू कुणी तरी सोडून दिले आहे. याविषयी वीजमंत्री तथा ज्येष्ठ मगो नेते सुदिन ढवळीकर यांना काल 'लोकमत'ने विचारले असता, ढवळीकर यांनी कुणी तरी सध्या 'एप्रिल फूल' करतोय, असे सांगून अशा प्रकारची शक्यता फेटाळून लावली.
मगोपचे आमदार पक्षाला सोडून जातील, अशी चर्चा जे करतात त्यांनी लक्षात घ्यावे की, एप्रिल फूल करण्याचा दिवस फक्त दि. १ एप्रिल होता. आता कुणी एप्रिल फूल करण्याचा व लोकांचे मनोरंजन करण्याचा विचार करू नये. काही वर्षांपूर्वी ज्या काळात आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ओफर होती, त्यावेळी देखील मी मगो पक्ष सोडून गेलो नाही. पंचवीस वर्षांहून अधिक काळ मी मगो पक्षात आहे व १९९९ पासून मगोपच्याच तिकीटावर निवडून येत आहे. कुणीही उगाच एप्रिल फूल करून अफवा पसरवू नये.
दरम्यान, मंत्री ढवळीकर हे काल गोव्याबाहेर होते. ते गोव्यात परतल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन दिल्लीत बी. एल. संतोष यांच्याशी झालेल्या सर्व चर्चेची माहिती त्यांना देणार असल्याचे समजते.