त्या जागांबाबत अजिबात तडजोड करणार नाही: अमित पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:03 IST2026-02-07T12:03:01+5:302026-02-07T12:03:16+5:30
बालेकिल्ले असलेल्या जागा काँग्रेस सोडणार नाही

त्या जागांबाबत अजिबात तडजोड करणार नाही: अमित पाटकर
लोकमत न्यूज नेटवर्क, मड़गाव : '२०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती कोणाशीही होवो, काँग्रेसचे मजबूत मतदारसंघ इतरांना दिले जाणार नाहीत,' असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या जागांबाबत तडजोड केली जाणार नाही. सध्या काँग्रेसच्या आमदारांचे प्रतिनिधित्व असलेले मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत इतर पक्षांना दिले जाऊ शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मडगावात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटकर म्हणाले की, 'काँग्रेस फक्त अशाच मतदारसंघांमध्ये समान विचारसरणीच्या पक्षांसोबत जागा वाटप करण्यास तयार आहे, जिथे पक्ष तुलनेने कमकुवत आहे किंवा जिथे काँग्रेसच्या - मतांचा वाटा कमी आहे.'
ती चूक पुन्हा होणार नाही
पाटकर म्हणाले की, आमची लढाई भाजपविरुद्ध आहे आणि आम्ही भाजप समर्थक पॅनलविरोधातच लढू. मैत्रिपूर्ण लढत ही आमची चूक होती, यावेळी आम्ही ती चूक पुन्हा करणार नाही. पाटकर म्हणाले की, 'मतदारांना स्पष्टता हवी आहे, आणि कोणतीही राजकीय व्यक्ती कोणत्या विचारधारेसाठी काम करत आहे हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे.'
महापालिका निवडणुकांबाबत शहरातील निवडणुकांना बोलताना पाटकर म्हणाले की, 'काँग्रेस पक्ष गांभीर्याने सामोरे जात असून लोकशाही मूल्ये, स्वच्छ प्रशासन आणि जनतेचे प्रश्न सोडवणे हेच पक्षाचे प्राधान्य आहे.
'आप'चा दावा फेटाळला
आम आदमी पक्षाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना पाटकर म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसने नव्हे तर 'आप'नेच एकटे जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने आपच्या पाठिंब्यामुळे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकल्याचा आपचा दावाही त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, 'अलीकडील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालांनी उलट सिद्ध केले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसने ११ जागा जिंकल्या, तर 'आप'ने खराब कामगिरी केली आहे.'
आपण कोणत्या विचारधारेसोबत हे उत्पल यांनी स्पष्ट करावे
महापालिका निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांनी आपल्या पॅनलसाठी इतर पक्षांचा पाठिंबा घेण्याबाबतीत आपल्याला काही गैर वाटत नाही, असे विधान केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी उत्पल यांनी ते कोणत्या विचारधारेसोबत आहेत, हे आधी सांगणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
उत्पलनी आपली राजकीय भूमिका आणि विचारधारा स्पष्ट करावी, असे आवाहन पाटकर यांनी केले आहे. ते म्हणाले की, 'राजकारणात पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. उत्पल नेमके कोणत्या विचारधारेसोबत आहेत, कोणत्या राजकीय भूमिकेवर उभे आहेत, हे जनतेला स्पष्ट झाले पाहिजे. केवळ निवडणुकीपुरते किंवा परिस्थितीनुसार भूमिका बदलणे योग्य नव्हे.'
'एल्टन मला मोठ्या भावासारखे'
दरम्यान, आमदार एल्टन माझ्यासाठी थोरल्या बंधूंसारखे आहेत, असे पाटकर म्हणाले. एल्टन यांनी अलीकडेच पाटकर यांना असा सल्ला दिला होता की, पाटकर यांनी आधी निवडणूक जिंकून दाखवावे, नंतर त्यांना युतीचे महत्त्व कळेल. यासंबंधी विचारले तेव्हा पाटकर म्हणाले, एल्टन यांचा हा सल्ला मी गंभीरपणे घेतो. मी सर्व ४० मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष म्हणून फिरतो. लोकांशी संवाद साधत असतो. मी व्यक्त केलेली भावना ही संपूर्ण राज्याची असते.