समविचारींनी एकत्र येण्यास हरकत नाही : विजय सरदेसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:38 IST2025-10-03T12:38:03+5:302025-10-03T12:38:44+5:30
दसऱ्याच्या मुहुर्तावर आरजी-गोवा फॉरवर्ड युतीचे संकेत

समविचारींनी एकत्र येण्यास हरकत नाही : विजय सरदेसाई
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारच्या मनमानीविरोधात गोमंतकीय पेटून उठले आहेत. राज्यात हळूहळू लोकचळवळ उभी राहत आहे. विरोधक जास्त नसले तरी लोक प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावर उतरतात ही चांगली बाब आहे. गोमंतकीयांना चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे, असे मत गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी समविचारी लोकांनी एकत्र येण्यास हरकत नाही असे सांगत दसऱ्याच्या मुहुर्तावर आरजी-गोवा फॉरवर्ड युतीचे संकेत दिले. सरदेसाई म्हणाले की, 'अलीकडेच सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला प्रकरणी लोक रस्त्यावर उतरले. मोपा विमानतळावरील टॅक्सीच्या विषयावर टॅक्सीमालक एकत्र आले. जीसीएची निवडणूक भाजपच्या विरोधात गेली. विद्यापीठातील विद्यार्थी मंडळ निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिलेल्यांचा पराभव झाला. लोकांना तुम्ही जेवढे दाबाल, तेवढे ते जागरूक होत आहेत.
विजय सरदेसाई म्हणाले, 'राज्यातील जमिनी हडप करून परप्रांतीयांना दिल्या जात आहेत. गोमंतकीयांच्या नोकऱ्या परप्रांतीयांच्या वाट्याला जातात. सांकवाळ येथे एक लमाणी महिला सरपंच होते. तिला कोंकणीसुद्धा बोलता येत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे नेपाळींना जाऊन भेटतात. राज्यात बिहार दिन साजरा केला जातो. मग यात गोमंतकीय कुठे उरले? आम्ही गोमंतकीयांच्या मतांवर निवडून आलो आहोत. आम्ही जर आता झोपून राहिलो तर आम्ही नालायक ठरू. दसऱ्याच्या मुहुर्तावर आम्ही जागे होणे गरजेचे आहे.
ते इथे येऊन गोवा चालवतील?
सरदेसाई म्हणाले की, 'गोमंतकीय पक्षच गोव्याच्या हिताचा जास्त विचार करू शकतात. इतर पक्षांची सूत्रे दिल्लीतून हलतात. त्यामुळे तेथून इथे येईपर्यंत वेळ लागतो. निवडणुकीच्यादृष्टीने नंतर विचार करता येईल. पण, सध्या गोवा वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. अमित शाह आणि केजरीवाल येथे येऊन गोवा चालवू शकत नाहीत. तो इथल्या लोकांनी चालवायला हवा. आमचे एकच म्हणणे आहे की इथल्या जमिनीवर, नोकऱ्यांवर, बाजारपेठेवर गोमंतकीयांना प्राधान्य दिले पाहिजे.
काँग्रेसला अखेरच्या क्षणी जाग येते
'काँग्रेससोबत आमची युती आहे. राहुल गांधी यांना मी तुमच्यासोबतच असेन हे वचन दिले होते. हे वचन मी पाळत आहे' असे सांगून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीबाबत बोलताना सरदेसाई म्हणाले की, 'काँग्रेस राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे, हे मान्य करावे लागले. त्यामुळे त्यांनी विरोधकांना मार्ग दाखविण्याची गरज आहे. पण वास्तवात असे होत नाही. त्यांना आधी त्यांच्या घरातील गोष्टी अजून जाग्यावर सापडत नाहीत. ग्राउंड लेव्हलवर त्यांचे काम नाही. आता जिल्हा पंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तरीही त्यांच्याकडून काहीच हालचाल नाही. राज्यातील काँग्रेसवाले अखेरच्या क्षणी जागे होतात. तोपर्यंत वेळ गेलेली असते.
विरोधकांनी एकत्र येण्याची गरज
आमदार सरदेसाई म्हणाले की, 'विरोधकांनी गोवा आणि गोमंतकीयांसाठी एकत्र येण्याची गरज आहे. मनोज परब आणि मी त्यादिवशी एकाच मुद्द्यावर एकत्रित आलो. हे काही नियोजित नव्हते. ते घडून आले. त्यांचे जे म्हणणे होते, तेच आमचे म्हणणे आहे. आम्ही गोमंतकीयांसाठी लढत होतो. आता त्यांना सोबत घेऊन लढायची वेळ आली तर ते आम्ही करू. कारण त्यात काहीच चुकीचे नाही.