मंत्रिमंडळ बदल सध्या नाहीच; मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:32 IST2025-07-03T12:31:07+5:302025-07-03T12:32:03+5:30
काही विषयांवर चर्चा

मंत्रिमंडळ बदल सध्या नाहीच; मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना सध्या होणार नाही. नवी मंत्रिपदे सध्या कुणालाच दिली जाणार नाहीत. अगोदर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे निवडू द्या, अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी काल गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना दिल्याची माहिती दिल्लीहून प्राप्त झाली.
विश्वजीत राणे हे गेले दोन दिवस दिल्लीमध्ये होते. त्यांनी काल भाजपचे केंद्रीय नेते तथा गृहमंत्री शाह यांची भेट घेतली. शाह यांचे गोव्यातील राजकारणावर बारीक लक्ष असते. त्यांच्याकडे सगळी माहिती असते. विश्वजीत राणे शाह यांना भेटले, तेव्हा शाह यांनी गोव्यात सध्या कोणताच बदल होणार नाही, हे स्पष्ट केले.
गोव्यातील सगळी माहिती आमच्याकडे आहे. मंत्रिमंडळात योग्यवेळी बदल होतील, सध्या काही बदल होणार नाहीत, असे शाह यांनी मंत्री राणे यांना सांगितले. मंत्री राणे यांनी आपण शाह यांना भेटल्याची माहिती 'लोकमत'ला दिली. मात्र, त्यांनी त्यांच्याशी काय चर्चा झाली, ते मात्र, सांगितलेले नाही.
राष्ट्रीय अध्यक्ष निवडीनंतरच
गोवा विधानसभेचे अधिवेशन २१ जुलैला सुरू होईल. ८ ऑगस्ट रोजी अधिवेशन संपुष्टात येईल. तथापि, भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जुलैअखेरीस निवडले जाण्याची शक्यता आहे. गोव्यात दोघा-तिघा मंत्र्यांना वगळणे व काही आमदारांना मंत्रिपदे देणे, अशी योजना आहे. याची अंमलबजावणी ऑगस्ट महिन्यात होऊ शकते, असे आता विश्वजीत राणेंच्या दिल्ली भेटीनंतर अधिक स्पष्ट झाले. भाजपचे राष्ट्रीय नेते सध्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवड प्रक्रियेत व्यस्त आहेत.
संतोष यांच्याशीही चर्चा
नुकतेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत व कळंगुटचे आमदार मायकल लोबो हेही एकत्रपणे शाह यांना भेटले. लोबो यांनीही नंतर गोव्यात मीडियाला सांगितले की, सध्या मंत्रिमंडळात बदल होणार नाही. विधानसभा अधिवेशनापूर्वी कोणतेच बदल होणार नाहीत, असे वृत्त यापूर्वीही दिल्लीहून आले होतेच. विश्वजीत राणे यांनी नुकतीच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचीही भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ फेररचनेपूर्वी केंद्रीय नेतृत्वाकडून मुख्यमंत्री सावंत व मंत्री विश्वजित या दोघांनाही एकत्र बोलावून चर्चा केली जाईल, असे सुत्रांनी सांगितले. गोव्यातील काही वादांच्या विषयावरही एकत्र चर्चा होईल.