साळावलीत ९७ तर तिळारीत १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:16 IST2025-05-06T14:15:51+5:302025-05-06T14:16:49+5:30

'साळावली'त ९७ दिवस तर 'तिळारी'त १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती मंत्र्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

there is enough water in salaulim dam for 97 days and in tilari dam for 104 days | साळावलीत ९७ तर तिळारीत १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

साळावलीत ९७ तर तिळारीत १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी उच्चस्तरीय बैठकीत धरणांच्या स्थितीचा आढावा घेतला. 'साळावली'त ९७ दिवस तर 'तिळारी'त १०४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याची माहिती मंत्र्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

राज्यातील सर्व धरणांमधील जलाशयांच्या तसेच गोवा-महाराष्ट्राच्या तिळारी धरण प्रकल्पातील स्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. पाण्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. बार्देश, डिचोली, पेडणे तालुक्यांना पाणी पुरवणाऱ्या तिळारी धरणात १०४ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर पडला तरी समस्या उद्भवणार नाही. संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणात ९७ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. चापोली धरणात २०० दिवस पुरेल एवढा तर अंजुणे व पंचवाडी धरणात ६० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. आमठाणे जलाशयातील पाणी कमी झाल्यास साळ येथील शापोरा नदीतून पंपिंग करून पाणी घेतले जाते.

दरम्यान, कडक उन्हामुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होऊ लागल्याने धरणे आटत चालली आहेत. त्यातच पाण्याचा वापरही वाढलेला आहे. सध्या पाण्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नसली तरी कोणीही पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन मंत्री शिरोडकर यांनी केले आहे.

अस्नोड्याचा १३० एमएलडी पाणी प्रकल्प व पर्वरीचा १५ एमएलडी प्रकल्प तिळारीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. तिळारीचे पाणी कमी झाल्यास साळ येथील शापोरा नदीचे पाणी आमठाणेत पंपिंग करून घेतले जाते व तेथून ते अस्नोडा प्रकल्पाला पुरवले जाते. तिळारी किंवा अन्य धरणांच्या कालव्यांमधून बागायतींना दिले जाणारे पाणी दरवर्षीप्रमाणे येत्या १५ मे पासून दरदिवसाआड किंवा मर्यादित दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या राज्यातील बहुतेक सर्वच पाणीपुरवठा प्रकल्पांची क्षमता वाढण्याचे काम सुरू आहे.

चापोली धरणावर मॉनिटरिंग सिस्टम

काणकोण तालुक्यातील चापोली धरणावर जलसंपदा व्यवस्थापन आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी रिअल-टाइम क्लाउड-आधारित मॉनिटरिंगसह रडार सेन्सर बसवण्यात येणार आहेत. जलस्रोत खात्याने या प्रणालीसाठी ८.३५ लाख रुपये खर्चाची निविदा काढली आहे. धरणातील पाण्याची पातळी आणि संबंधित अचूक माहिती मिळवण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल.
 

Web Title: there is enough water in salaulim dam for 97 days and in tilari dam for 104 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.