रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:56 IST2025-09-27T12:54:59+5:302025-09-27T12:56:02+5:30
अधिक बोलण्यास नकार

रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : क्रीडा मंत्री रमेश तवडकर व आमदार गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नानंतर सावंत यांनी या विषयावर अधिक काही बोलण्याचे टाळले.
आमदार गावडे यांनी मंत्री तवडकर यांच्यावर टीका चालूच ठेवली आहे. आपण पुस्तक बंद करणारा माणूस नव्हे, असेही त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी दोघांमध्ये अजूनही जो संघर्ष चालला आहे, त्याबद्दल विचारले असता मुख्यमंत्र्यांनी वरील भाष्य केले. गावडे यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तवडकरांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला होता.
प्रियोळात 'भस्मासुरांशी' हातमिळवणी करून तवडकरांचे 'श्रमधाम' चालू असल्याची टीका आमदार गावडे यांनी केली होती. 'तवडकर यांनी मला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी 'सुपारी' घेतली आहे', असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला होता. नवीन 'उटा' काणकोणात दाखल झाली आहे, बघूया कुठे वारे वाहते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
'तवडकर याना क्रीडामत्रा असताना खात्याची करून ठेवलेली देणी मी मंत्री झाल्यानंतर फेडली. मी ग्रामीण विकासमंत्री होतो. त्यापूर्वीच्या मंत्र्याने चार वर्षांचा निधी खर्च करून ठेवला होता. माझ्यासाठी काही शिल्लक नव्हते. तरीही मी ते खाते चालवले. मी कधी रडून दाखवले नाही. मी क्रीडा खात्यामध्ये कर्ज करून ठेवले, असे तवडकर जे सांगताहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहे. उलट त्यांनी करून ठेवलेली देणीच मी फेडली', असेही गावडे म्हणाले होते.
विषय संपलेला आहे : रमेश तवडकर
दुसरीकडे तवडकर यांनी मात्र 'माझ्या दृष्टीने गावडेंचा विषय संपलेला आहे', असे नमूद करून आपण या विषयावर काहीच बोलणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
मी मुख्यमंत्र्यांशी बोललो...
सामाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकर यांच्यावर जो हल्ला झाला, तो निषेधार्ह आहे. काणकोणकर हे आदिवासी समाजाचे आहेत. 'उटा'ने सर्वप्रथम त्यांचा विषय हाती घेतला. मी मुख्यमंत्र्यांकडे बोललो व गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही आरोपींची कोणतीही गय केली जाणार नाही, असे सांगून धडक कारवाई केलेली आहे', असेही गावडे यांनी म्हटले होते.