...तर लोक आमदारांना बडवतील : जीत आरोलकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:50 IST2026-01-08T13:49:53+5:302026-01-08T13:50:56+5:30
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरोलकरांनी दिले निवेदन.

...तर लोक आमदारांना बडवतील : जीत आरोलकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : राज्यात मोठ्या प्रमाणात घाऊक पद्धतीने जमिनी रुपांतरित करता येत नाहीत. आमदारांनी आवाज काढून हे थांबवावे लागेल. आमदार गप्प राहिले व साठ लाख वगैरे चौरस मीटर जमीन जर रुपांतरित झाली तर ते गंभीर ठरेल. प्रसंगी लोक आमदारांना बडवतील, अशी तीव्र प्रतिक्रिया मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आरोलकर म्हणाले की, मी येत्या विधानसभा अधिवेशनातही आवाज उठवीन. मी गप्प राहणार नाही. पेडणे तालुक्यात ६० लाख चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनीला टीसीपीने प्रोविजनल मान्यता दिली आहे. ही मान्यता रद्द करावी लागेल. टीसीपी खात्याने विचार करावा.
मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना निवेदन दिले आहे. टीसीपी कायद्याच्या कलम १७(२) आणि ३९(ए) खाली जी भू रुपांतरणाला मान्यता दिली आहे, ती रद्द करण्यासाठी प्रसंगी आपण लोकांसोबत पुन्हा रस्त्यावर उतरेन.
आमदार आरोलकर म्हणाले, की पेडणे तालुक्याचा हिरवागार निसर्ग राखून ठेवावा लागेल. ६० लाख जमीन रुपांतरित झाली तर सगळे डोंगर वगैरे बोडके होतील. तिथे मोठ्या इमारती, बंगले उभे राहतील. देवी भगवती आमच्याकडे पाहत आहे. देवी भगवती देखील उत्सवावेळी हिरवे वस्त्र परिधान करते. ते वस्त्र म्हणजे पेडण्यातील हिरव्या निसर्गाचे प्रतीक आहे. हे प्रतीक टीसीपी खात्याने विचारात घ्यावे, त्या प्रतीकाविरुद्ध काम करू नये.
भू-रूपांतरणाबाबत तक्रार तपासून पाहीन : सावंत
पेडणे तालुक्यातील ६० लाख चौ. मि. जमिनीच्या झालेल्या बेकायदा रुपांतरणाबद्दल मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी केलेली तक्रार तपासून पाहीन व ती नगर नियोजन खात्याला पाठवीन, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
जीत यांनी सादर केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,' नगर नियोजन कायद्याच्या कलम १७ ब आणि ३९ अ अंतर्गत तरतुदींचा गैरवापर करुन सुमारे ६० लाख चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या २३८ भूखंडांचे झोनिंग सेटलमेंटमध्ये बदलण्यात आलेले आहे. या प्रकरणावर कारवाई करण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदतही त्यांनी दिलेली आहे. आरोलकर यांनी झोर्निंग बदल मागे घेण्याची विनंती केली आहे. २३८ मालमत्तांपैकी अनेक जमिनी बिगर गोमंतकीयांनी खरेदी केल्याचे त्यानी म्हटले आहे.
स्थानिक रहिवाशांशी सल्लामसलत न करता कोणत्याही प्रस्तावावर पुढे जाऊ नये असे आवाहन त्यांनी नगर नियोजन खात्याला केले आहे. आरोलकर म्हणाले की त्यांनी अशा जमिनीच्या रूपांतरणाविरुद्ध स्थानिकांना नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि आपण नेहमीच लोकांसोबत. हरमल येथे अलीकडेच अशाच एका मोठ्या भूखंडाच्या रुपांतरण प्रकरणी वाद झाल्यानंतर मंत्री विश्वजित राणे यांनी यांनी प्रस्तावित जमीन रूपांतरण रद्द केले. दरम्यान, येत्या ११ रोजी पेडणेतील भगवती मंदिरात एकत्र येऊन निषेध केला जाईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.