आकाश मर्यादित नाही, स्वप्नांना दिशा द्या: शुभांशु शुक्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 11:48 IST2026-02-07T11:47:17+5:302026-02-07T11:48:17+5:30
येथील गोवा बुक फेस्टिव्हलनिमित्ताने आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

आकाश मर्यादित नाही, स्वप्नांना दिशा द्या: शुभांशु शुक्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तुमच्यातील एखादा मुलगा किंवा मुलगी चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. मात्र त्यासाठी स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी प्रचंड मेहनत, शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. आकाशाला मर्यादा नाहीत, तुमच्या स्वप्नांना दिशा द्या, असे आवाहन भारतीय अंतराळवीर, वायुसेनेतील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला केले.
येथील गोवा बुक फेस्टिव्हलनिमित्ताने आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत. मात्र केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नसून, त्यासाठी प्रचंड मेहनत, शिस्त आणि सातत्याची गरज असते. अंतराळ क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी विज्ञान विषयांवरील भक्कम पाया असणे अत्यंत आवश्यक आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध जीवनशैली आणि देशासाठी काहीतरी करण्याची तीव्र जिद्द या गोष्टी यशासाठी महत्त्वाच्या ठरतात.
कॅप्टन शुक्ला म्हणाले, की भारताने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःसाठी मोठी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. ही स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज आहे. आकाश कधीच माझ्यासाठी मर्यादा नव्हते. ते तुमच्यासाठीही नाही आणि भारतासाठीही नाही. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
अंतराळात गेल्यावर पृथ्वीच आपले घर बनते
अंतराळातील अनुभव हा माझ्यासाठी एक दृष्टीकोन ठरवणारा होता. अंतराळात गेल्यावर संपूर्ण पृथ्वीच आपले घर बनते. तिथे कोण कोणत्या देशाचा आहे, हे महत्त्वाचे राहत नाही. मी पृथ्वीचा आहे ही एकच भावना मनात असते व ती मन बदलणारी असते. तुमच्यातील एखादा मुलगा किंवा मुलगी चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा असून तुम्ही ती पूर्ण कराल, शुक्ला म्हणाले.