नवा सोमवार उत्सवाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:51 IST2025-11-25T11:50:55+5:302025-11-25T11:51:37+5:30
या उत्सवात भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.

नवा सोमवार उत्सवाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: डिचोलीची ग्रामदेवी श्री शांतादुर्गेच्या प्रसिद्ध 'नवा सोमवार' उत्सवाला काल, सोमवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या उत्सवात भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.
फेरीवाल्यांनी दुकाने थाटल्याने रस्ते फुलून गेले होते. रात्री दोन्ही पालख्या भाविकांच्या भेटीसाठी मिरवणुकीने बाहेर पडल्या होत्या. दोन्ही ठिकाणी आयोजित केलेल्या गायनाच्या मैफलीही रंगल्या. रसिक प्रेक्षकांना दर्जेदार गायक कलाकारांच्या गायनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
गावकरवाडा येथील देवी शांतादुर्गेच्या मंदिरात सकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर दिवसभर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. सुवासिनी महिलांनी देवीच्या चरणी ओटी अर्पण करीत आपली सेवा रूजू केली. रात्री मंदिरात देवीची पालखी सजविण्यात आली. आरती व गाऱ्हाणे घातल्यानंतर पालखी वाजत गाजत, दिंडी, बँड पथकासह मंदिराबाहेर काढून मंदिरासमोरील मंडपात ठेवण्यात आली. तिथे भाविकांनी देवीचे दर्शन घेत ओटी अर्पण केली. त्यानंतर समृद्ध चोडणकरनिर्मित 'हृदयाच्या तालावर' हा गायनाचा बहारदर कार्यक्रम सादर झाला. त्यात सुप्रसिद्ध गायक राजयोग धुरी, सोबत गायिका शमिका भिडे मुंबई यांनी गायन सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन डॉ. गोविंद भगत यांनी केले. या संगीत मैफलीनंतर पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला.
या उत्सवानिमित्त श्री शांतादुर्गा मठमंदिरात कार्यक्रमाची पहिली बैठक झाली. त्यात पंडित जितेंद्र बुवांचे नातू अभेद्य अभिषेकी तसेच अभिनेत्री पार्श्वगायिका व संगीतकार केतकी चैतन्य यांच्या गायनाचा कार्यक्रम रंगला. त्यांना ऑर्गनवर राया कोरगावकर, हार्मोनियमवर प्रसाद गावस, तबल्यावर हनुमंत बीटये, पवन वळवईकर यांनी साथसंगत केली.
या नवा सोमवार उत्सवानिमित्त शहरातील राधाकृष्ण विद्यालय, शांतादुर्गा हायस्कुलमध्ये विविध प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या दोन्ही प्रदर्शनांना भरभरून प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या हातांनी बनविलेल्या कलाकुसरींचे लोकांनी कौतुक केले. पुस्तक प्रदर्शन व इतरही कलात्मक वस्तूंचा उत्सवात सहभाग होता.
उत्सव सुरळीतपणे पार पडावा यासाठी डिचोली पोलिस उपअधीक्षक बी.व्ही. श्रीदेवी, पोलिस निरीक्षक विजय राणे, उपनिरीक्षक व इतर पोलिस कर्मचारी लक्ष ठेवून होते. तसेच वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस व इतर वाहतूक पोलिस कर्मचारी उत्सवाच्या वेळी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये व लोकांना त्रास होऊ नये यासाठी कार्यरत होते.
नयनरम्य पालखी सोहळा
आतीलपेठ डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मठमंदिरात श्री देवी शांतादुर्गा देवस्थान बाजारकर दहाजण व नवा सोमवार उत्सव समितीतर्फे होणाऱ्या या उत्सवात सकाळी मठ मंदिरात धार्मिक विधी पार पडले. रात्री ७ वा. श्री देवी शांतदुर्गेची पालखी मठमंदिरातून सजवून बाहेर काढण्यात आली व श्री लक्ष्मीनारायण मंदिराजवळ ठेवण्यात आली. १० वा. च्या सुमारास बँड पथकासह पालखी मिरवणुकीला प्रारंभझाला. पालखी आतीलपेठ, सोनारपेठ, भायलीपेठ व बोर्डे वडाकडेपर्यंत जाऊन माघारी फिरून भायलीपेठ, सुंदरपेठ मार्गे आतीलपेठ येथील मठमंदिरात आज, मंगळवारी दुपारी विधीवतपणे दाखल होणार व या उत्सवाची सांगता होणार आहे.