लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 08:25 IST2025-12-12T08:20:27+5:302025-12-12T08:25:53+5:30
गोवा आग प्रकरणी 'लुथरा बंधूं'ना भारतात आणण्यास विलंब का? थायलंडमध्ये अटक, पण 'या'मुळे प्रक्रिया अडली!

लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
गोव्यातील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईटक्लबला आग लागल्याप्रकरणी पोलिसांच्या तावडीतून सुटून थायलंडला पळून गेलेल्या सौरभ आणि गौरव लुथरा या उच्चभ्रू बंधूंना अखेर थायलंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्यांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे.
विलंब कशामुळे?
लुथ्रा बंधूंना भारतात परत आणण्यासाठी लागणाऱ्या वेळेमागे त्यांच्या पासपोर्टची समस्या हे मुख्य कारण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे, त्यांना भारतात परत आणण्यासाठी दूतावासाकडून आपत्कालीन प्रवास प्रमाणपत्र जारी करावे लागेल. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच त्यांना भारतात आणले जाईल. जर ही प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली नाही, तर शनिवार आणि रविवार सरकारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे ती थेट सोमवारी पुन्हा सुरू होईल. त्यामुळे परत आणण्यास ४ ते ५ दिवस लागू शकतात.
केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे अटक
गोव्यातील नाईटक्लबला आग लागल्यानंतर लुथ्रा बंधूंनी त्वरित थायलंडला पळ काढला. या बातमीमुळे खळबळ उडाली. केंद्र सरकारने तातडीने थायलंड सरकारशी संपर्क साधला, त्यानंतर थायलंड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.
उच्चस्तरीय बैठक
या गंभीर प्रकरणावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या निवासस्थानी महासंचालक आलोक कुमार आणि डीआयजी वर्षा वर्मा यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे सूत्रांकडून समजते.