सरकारने गोमंतकीयांच्या तोंडाला 'कोळसा' फासला: अमित पालेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 07:37 IST2025-09-03T07:36:22+5:302025-09-03T07:37:25+5:30
राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून गोव्यासाठी रस्त्यावर उतरावे

सरकारने गोमंतकीयांच्या तोंडाला 'कोळसा' फासला: अमित पालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेल्वे दुपदरीकरण व कोळसा वाहतुकीवरून सरकारने जनतेच्या तोंडाला कोळसा फासला आहे. याविरोधात सर्वांनी आपला राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून गोव्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा नेते अॅड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
कोळसा वाहतुकीसाठीच रेल्वे दुपदरीकरण हा प्रकल्प आणला जात आहे. केंद्र सरकारने सुद्धा ते स्पष्ट केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही आमच्या चेहऱ्यांना कोळसा फासल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी संदेश तळेकर व अन्य उपस्थित हाते.
अॅड. पालेकर म्हणाले, की गोव्याला रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाचा कुठलाही फायदा नाही. सदर प्रकल्पाला लोकांचा विरोध आहे. परंतु, तरीसुद्धा सरकार हा प्रकल्प केवळ अदानी तसेच कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या फायद्यासाठी पुढे नेत आहे. मात्र, केंद्रातील नेत्यांशी या कंपन्यांचे चांगले संबंध आहे. त्यामुळे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची या प्रकल्पाला विरोध करण्याची हिंमत होत नाही. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात कोळसा वाहतूक होणार नसल्याचे विधान काही वर्षापूर्वी केले होते. तसेच विधान विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सुद्धा करून ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
रेल्वे दुपदरीकरणाच्या नावाखाली कोळसा वाहतूक होणार आहे. यामुळे निसर्गाची मोठी हानी होईल, लोकांची घरे जातील, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचे काय? या प्रकल्पाविरोधात काँग्रेसमध्ये असताना आवाज उठवणारे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आता गप्प का? या प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवत रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे पालेकर यांनी सांगितले.
प्रकल्पाची जबरदस्ती का?
गोमंतकीयांचा रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध आहे. या प्रकल्पाची गरज नाही. सरकारला विकास करायचाच असेल तर तो शाश्वत असावा. सरकारने हा प्रकल्प आणण्याची जबरदस्ती करू नये, तो जनतेवर लादू नये, असे पालेकर म्हणाले.