राज्यातील २.९० लाख मतदारांचे भविष्य धोक्यात; काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:50 IST2026-01-14T08:50:00+5:302026-01-14T08:50:23+5:30
एसआयआरमुळे मतदारांची नावे रद्द होण्याची भीती.

राज्यातील २.९० लाख मतदारांचे भविष्य धोक्यात; काँग्रेसचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : निवडणूक आयोगाच्या एसआयआर मोहिमेअंतर्गत गोव्यातील २.९० लाख मतदारांचे भविष्य धोक्यात आले आहेत. त्या सर्वांची नावे मतदारयादीतून रद्द होण्याची भीती असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
एसआयआर नावाखाली भाजप मतदारांना लक्ष्य करीत आहेत. आम्ही या गोष्टींविरोधात आवाज उठवणार असून, त्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोएल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या प्रश्नी दखल घ्यावी, त्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
पाटकर म्हणाले, की एसआयआर म्हणजेच मतदारयादीची विशेष उजळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, सुमारे एक लाख आठ हजार गोमंतकीय मतदारांची नावे रद्द करण्यात आली आहेत. यात काही जण मृत, घरच्या पत्त्यावर आढळून आली नाहीत, स्थलांतरित झाली अशी विविध कारणे निवडणूक कार्यालयाने दिली आहेत. प्रत्यक्षात नावे रद्द करण्यापूर्वी या लोकांना कायद्यानुसार कारणे दाखवा नोटीस बजावणे आवश्यक होते. मात्र, तसे काहीच न करता त्यांची नावे थेट रद्द केली. त्यामुळे आपली नावे रद्द झाली आहे का? याचीही माहिती लोकांना कळणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय 'अनमॅप्ड' असे नमूद करून सुमारे १ लाख ८२ मतदारांना नोटीस जारी झाली आहे. त्यांना सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले असून, यात नौदलाचे माजी अॅडमिरल तसेच दक्षिण गोवा खासदार कॅप्टन व्हिरियतो फर्नाडिस यांचाही समावेश आहे. त्यामुळे या सर्वांची मिळून सुमारे २.९० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून रद्द होण्याची भीती आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने नावे रद्द होऊ नये, मतदारांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी या गोष्टीची दखल घ्यावी अशी मागणी पाटकर यांनी केली.
काहींना नोटीस, काहींना नाही...
एसआयआर अंतर्गत अनमॅप्ड असे नमूद करून काहींना निवडणूक आयोगाने नोटीस जारी करून सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, काहींना नोटीसही पाठवलेली नाही. जर त्यांची नावे मतदारयादीतून डिलीट झाली तर त्यास जबाबदार कोण? एसआयआरबाबतची वेळ वाढवावी, अशी मागणी आमदार कार्ल्स फेरेरा यांनी केली.