उगवे गावात 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ सुरूच; शेतातील मळ्यात भातशेती, कवाथे, सुपारी, केळीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:00 IST2025-09-26T12:59:32+5:302025-09-26T13:00:01+5:30
ओंकारला हटविणे दिवसेंदिवस बनतेय कठीण, तज्ज्ञ अधिकारी नाहीत

उगवे गावात 'ओंकार' हत्तीचा धुमाकूळ सुरूच; शेतातील मळ्यात भातशेती, कवाथे, सुपारी, केळीचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : सात दिवस तांबोसे गावात शेतीची मोठ्याप्रमाणात नासधूस केल्यानंतर 'ओंकार' नावाचा हत्ती आता उगवे गावात दाखल झाला आहे. मागील दोन दिवसांपासून त्याने भातशेती, केळी, कवाथे आणि पोफळींची (सुपारी) झाडे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी हवालदिल झाले असून, तज्ज्ञ अधिकारी आणि हत्ती पकडणारे पथक अजूनही न आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या दहा दिवसांत ४०० किलोमीटरचा प्रवास करत ओंकार हत्ती कडशी, मोपा, तोरसे, तांबोसे मार्गे उगवे येथे पोहोचला. तांबोसे गावात शैलेश सामंत, पांडुरंग आसोलकर, रवींद्र गवंडी, दिलीप सामंत, दयानंद गवंडी, संतोष शिरोडकर, मंगेश गवंडी यांची शेती उद्ध्वस्त झाली. त्याचबरोबर अनिशा सामंत, हरीश पाटील व महादेव सामंत यांनाही फटका बसला.
कृषी विभागाने नुकसानीची पाहणी केली असली तरी भरपाई किती मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अल्प मोबदला देऊन प्रश्न सुटत नाही, तर तातडीने हत्तीला पकडून मूळ ठिकाणी परत पाठवावे. सरकार व वनखात्याने तज्ज्ञ पथक बोलावून हत्तीचा बंदोबस्त त्वरित करावा. अन्यथा आम्ही हत्तीच्या भीतीत जगणार कसे?, असा सवाल केला.
सरकारवर शेतकऱ्यांची तीव्र नाराजी
शेतकऱ्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. हत्तीमुळे जर पुन्हा मोठ्या प्रमाणात नासधूस झाली, तर आम्ही जगायचे कसे? सरकार फक्त आश्वासने देत आहे, पण ठोस कारवाई होत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी उदय महाले आणि शशिकांत महाले यांनी दिली.
अधिकाऱ्यांची वाहने महामार्गावर
उगवे परिसरात ओंकार दिवसातून तासन्तास शेतामध्ये थांबतो, पोटभर खातो, तीन-चार तास लोळत पडतो आणि तहान लागल्यावर तेरेखोल नदीत अंघोळ करून पुन्हा शेत फस्त करतो. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांकडे केवळ गंडेल बॉम्ब आहेत, त्यापलीकडे कोणतीही साधने किंवा सुरक्षा व्यवस्था नाही. काही अधिकाऱ्यांची वाहने महामार्गावर उभी आहेत, मात्र प्रत्यक्ष शेतात परिस्थिती हाताळण्यासाठी तज्ज्ञांचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसते.